भाजीमार्केट आजपासून सुरू करणारच
आंदोलकांचा जिल्हा, तालुका प्रशासनाला इशारा : संकेश्वर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
संकेश्वर : येथील दुरदुंडीश्वर भाजी सौदा मार्केट सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाने अद्यापही परवाना दिलेला नाही. या निषेधार्थ संकेश्वर व्यापारी संघटना, शेतकरी व विविध संघटनांनी संकेश्वर बंदची मंगळवारी हाक दिली होती. या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी स्वयंघोषीत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भाजीमार्केट तातडीने सुरू करण्यासाठी यावेळी प्रांताधिकारी श्रवण नायक व तहसीलदार मंजुळा नायक यांना निवेदन देण्यात आले. सकाळी 10 वाजता गांधी चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. हा मोर्चा जिल्हा व तालुका प्रशासनाचा धिक्कार करीत दुरदुंडीश्वर भाजी सौदा मार्केट सुरू करावा, अशा घोषणा देत मोर्चा नेहरु रोड, सुभाष रोड, जुना पुणे-बेंगळूर मार्गे चन्नमा सर्कलवर पोहचला. या ठिकाणी मोर्चाचे सभेत रुपांतर झाले.
सभेत बोलताना व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अमर नलवडे म्हणाले, भाजीमार्केट परराज्यात स्थलांतर होत आहे. यामुळे संकेश्वरच्या महसुलात परिणाम होऊ लागला आहे. ही बाब गांभीर्याने घेऊन दुरदुंडीश्वर भाजी सौदा मार्केटला तातडीने परवाना द्यावा. अन्यथा नगर परिषदेच्या सर्व नगरसेवकांचा सामूहिक राजीनामा देण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. संगम सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील म्हणाले, संकेश्वर बाजारातील मिरची, गूळ, चिरमुरे, केळी, चटकदार मिसळ ऐकेकाळी प्रसिद्ध असलेला इतिहास आहे. पण या शहराचा बाजार टप्प्याटप्प्याने बाहेर जात आहे. याचा परिणाम शहराच्या विकासावर होत आहे. कोणत्याही परिस्थितीत जिल्हा प्रशासनाने दुरदुंडीश्वर भाजीमार्केट सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. बंदमध्ये माजी नगराध्यक्ष गजानन क्वळ्ळी, अप्पासाहेब शिरकोळी, श्रीकांत हतनुरी, उपनगराध्यक्ष विवेक क्वळ्ळी, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष संतोष मुडशी, नगरसेवक सुनिल पर्वतराव, संजय शिरकोळी, डॉ. जयप्रकाश करजगी आदी सहभागी होते.