वीर सावरकर यांच्या पुतळ्याचे अनावरण
अमित शाह यांच्या हस्ते कार्यक्रम, सरसंघचालक मोहन भागवत यांचीही उपस्थिती
वृत्तसंस्था / अंदमान, निकोबार
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदार सावरकर यांच्या पुतळ्याचे अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शुक्रवारी अंदमान-निकोबार द्वीपसमूहात संपन्न झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत या कार्यक्रमाला उपस्थित होते. अनावरण कार्यक्रमानंतर अमित शाह यांनी उपस्थित अनेक सावरकर भक्तांसमोर भाषण केले.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची देशभक्ती अजोड आहे. हिंदू समाजातील अनिष्ट प्रथा नष्ट करण्यासाठी त्यांनी केलेले कार्य महान आहे. भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात त्यांनी महत्वाची भूमिका साकारली होती. असे असूनही त्यांना स्वातंत्र्यानंतर आवश्यक तितका सन्मान दिला गेला नाही. त्यांची अवमाननाच करण्यात आली, असे प्रतिपादन अमित शहा यांनी भाषणात केले. त्यांनी या स्थानी शिक्षा भोगलेल्या अन्य स्वातंत्र्यसैनिकांचेही स्मरण करुन दिले.
देशासाठी हालअपेष्टा
भारताला ब्रिटिशांच्या परकीय सत्तेपासून स्वातंत्र्य मिळावे, म्हणून वीर सावरकरांनी सशस्त्र संघर्ष केला. त्यामुळे ब्रिटिशांनी त्यांना दोन आजन्म कारावासांची, अर्थात 50 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा दिली. ही शिक्षा अत्यंत यातनादायक होती. अंदमानचे कारागृह अशा शिक्षेसाठी जगात कुख्यात होते. कोणत्याही बंदीला अंदमानात पाठविले, की तो जिवंत परतणार नाही, अशी भावना त्याच्या कुटुंबियांचीही होत असे. अशा वातावरणात सावरकरांनी ही अत्याधिक यातनामय शिक्षा भोगली होती. सावरकरांनी स्वातंत्र्यसंग्रामाप्रमाणेच हिंदू समाजात सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठीही धाडसाने प्रयत्न केले. हे कार्य करताना त्यांनी स्वधर्मियांचा अत्याधिक विरोधही सहन केला. तथापि, त्यांनी त्यांचे कार्य शेवटच्या श्वासापर्यंत चालविले होते, अशी प्रशंसा अमित शाह यांनी केली.
आज अंदमान एक तीर्थस्थान
ज्या अंदमानात स्वातंत्र्यवीर सावरकर आणि अन्य देशभक्तांनी ‘काळ्या पाण्या’च्या यातनामय शिक्षा भोगल्या ते अंदमान आज देशभक्तांसाठी ‘तीर्थस्थान’ बनले आहे. या स्थळाशी वीर सावरकर यांच्याप्रमाणेच आणखी एक थोर देशभक्त सुभाषचंद्र बोस यांचेही नाव जोडले गेले आहे. सुभाषचंद्र बोस यांनी ब्रिटीशांशी सशस्त्र संग्राम करुन देशाचे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी ‘आझाद हिंद सेने’ची स्थापना केली होती. या सेनेने ब्रिटीशांविरोधात मोठे युद्ध छेडले होते. या युद्धातला प्रथम विजय याच द्वीपसमूहात मिळवून तो भाग या सेनेने स्वतंत्र केला होता. हा प्रसंग भारताच्या इतिहासात अविस्मरणीय आहे, अशी आठवणही त्यांनी करुन दिली.
सावरकरांची इच्छा केली पूर्ण
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी अत्यंत आदर होता. अंदमान आणि निकोबार या द्वीपांची नावे, शहीद आणि स्वराज अशी ठेवावीत आणि सुभाषचंद्र बोस यांच्या पराक्रमाची स्मृती जतन करावी, अशी त्यांची इच्छा होती. ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2018 मध्ये पूर्ण केली. या द्वीपसमूहातील हॅवलॉक द्वीप आणि नील द्वीप यांची नावे अनुकमे ‘स्वराज द्वीप’ आणि ‘शहीद द्वीप’ अशी 2018 मध्ये करण्यात आली आहेत, अशी माहितीही शाह यांनी दिली.
सावरकर उद्यानाचेही उद्घाटन
अमित शहा यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावे स्थापन करण्यात आलेल्या ‘वीर सावरकर प्रेरणा उद्यान’ या उद्यानाचेही उद्घाटन करण्यात आले. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी देशासाठी केलेला स्वातंत्र्यसंग्राम आणि त्यांनी केलेले अतुलनीय हिंदू समाज सुधारणा कार्य यांची स्मृती जतन करण्यासाठी, तसेच या कार्यांपासून आजच्या पिढीला देशभक्तीची प्रेरणा मिळावी, या उद्देशांनी या ‘वीर सावरकर प्रेरणा उद्याना’ची निर्मिती करण्यात आली आहे.
स्वातंत्र्यासाठी यातना भोगलेले नेते
ड देशाच्या स्वातंत्र्यासाठी वीर सावरकर यांनी भोगल्या अत्याधिक यातना
ड हिंदू समाजाच्या सुधारणेसाठी त्यांनी केलेले साहसी प्रयत्न कौतुकास्पद
ड स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्यापासून नव्या पिढीलाही मिळते प्रोत्साहन
ड देशाच्या भविष्यातील हितासाठी वीर सावरकरांच्या स्मृती जपणे आवश्यक