कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वेद अनंत बोलला

06:13 AM Nov 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अध्याय दुसरा

Advertisement

भगवंत म्हणाले, कर्म करून भोग वैभवाचा उपभोग घ्यावा असे वेदांचा हवाला देऊन सांगणाऱ्या आणि त्यांचे ऐकून त्याप्रमाणे वागणाऱ्या लोकांची बुद्धी भोगवैभवात गुंतल्यामुळे समाधीत स्थिर होऊ शकत नाही. असा अविचार करणारे लोक स्वर्गसुखाची इच्छा धरतात आणि परमात्म्यालाच विसरतात. त्यामुळे आयतीच प्राप्त झालेली स्वधर्म पालनाची संधी ते फळाचा अभिलाष धरून वाया घालवतात.

Advertisement

वेद त्रिगुणात्मक संसाराचे प्रतिपादन करणारे आहेत. पण तू त्रिगुणातीत हो, द्वंद्वरहित हो, नित्य सत्वगुणी हो असा मोलाचा सल्ला भगवंत अर्जुनाला देतात, ह्या अर्थाचा तिन्ही गुण वदे वेद त्यात राहे अलिप्त तू । सत्त्व सोडू नको सोशी द्वंद्वे निश्चिंत सावध ।।45।। हा श्लोक आपण अभ्यासत आहोत. त्यानुसार, हा संसार त्रिगुणयुक्त आहे आणि त्यापासून जीवाला धोका आहे. वेदातील उपनिषदाचा जो भाग आहे तो केवळ सात्विक आहे. कर्मादिकांचे ज्यात निरूपण आहे ते वेदांचे भाग रज व तम या गुणांनी युक्त आहेत. ते केवळ सुखदु:खाला कारणीभूत होतात. माणसाचे मन मायेच्या प्रभावाखाली असल्याने त्यातच रमते. म्हणून माणसाने तिन्ही गुण टाकून अंत:करणात फक्त आत्मसुखाचा विचार करून निरपेक्षतेने कर्म करावे. वेदांचा आशय लक्षात न घेता वेदांच्या शब्दश: अर्थ काढणाऱ्या लोकांच्या मनात कर्मफळाचा उपभोग घेण्याची दुर्बुद्धी वास करत असते पण माणसाने हे वेळीच ओळखून आपले हित कशात आहे ते लक्षात घ्यावे. ही गोष्ट अर्जुनाला समजावून सांगताना भगवंत वेदांना मोठ्या जलाशयाची उपमा देत आहेत. ते पुढील श्लोकात म्हणतात, ज्याप्रमाणे जेव्हा सर्वत्र पाणीच पाणी दिसत असते त्यावेळी विहिरीतल्या पाण्याचे महत्त्व आपोआपच कमी होते. जो विज्ञानी ब्रह्मवेत्त असतो त्याला वेद पूर्ण अवगत असल्याने वेदात काय सांगितलेले आहे आणि त्यातून काय घ्यायचे आहे हे त्याला बरोबर समजते.

सर्वत्र भरले पाणी तेंव्हा आडात अर्थ जो । विज्ञानी ब्रम्ह-वेत्त्यास सर्व वेदांत अर्थ तो ।।46।।

श्लोकाच्या विवरणात माऊली म्हणतात, वेदात पुष्कळ गोष्टी सांगितल्या आहेत. अनेक प्रकारचे साधनामार्ग सूचविले आहेत पण आपले हित ज्यात आहे तेच घ्यावे. जसे सूर्योदय झाला की, सर्व रस्ते दिसू लागतात पण आपण त्यातील आपल्या उपयोगाचा मार्गच निवडतो अथवा, पृथ्वीच्या पाठीवर भरपूर पाणी असले, तरी आपल्याला हवे तेवढेच पाणी आपण घेतो. त्याप्रमाणेच जे विज्ञानी ब्रह्मवेत्ते आहेत, ते वेदार्थाचा विचार करतात आणि आपल्याला अपेक्षित अशा शाश्वत परब्रम्हतत्वाचाच फक्त स्विकार करतात. त्यामुळे स्वधर्माचे पालन करून ते मोक्षसुखाचे धनी होतात.

इथं आणखी एक असंही उदाहरण देता येईल की, एखाद्या देवस्थानच्या जत्रेमध्ये तिथे जमणाऱ्या गर्दीचा फायदा घेण्यासाठी फेरीवाल्यांनी खाऊ, खेळणी, जादूचे प्रयोग, पाळणे ह्यांची एकच धमाल उडवून दिलेली असते. त्याचे आकर्षण ज्याला वाटत असते तो देवदर्शनाकडे दुर्लक्ष करून त्यातच बराच काळ रमतो आणि उशीर झाल्याने कळसदर्शन घेऊन परततो पण ज्याचे देवदर्शन हेच ध्येय असते तो त्या आजूबाजूंच्या आकर्षक गोष्टींकडे पाठ फिरवून सरळ देवळात जाऊन मनोभावे देवदर्शन घेतो. त्याला माहित असते की, ह्यातच आपले कल्याण आहे. त्याप्रमाणे वेदात अनेक गोष्टी सांगितल्या असल्या तरी आपल्या भल्याच्याच गोष्टी त्यातून उचलणे शहाणपणाचे असते. म्हणून तुकाराम महाराज सांगतात,

वेद अनंत बोलिला । अर्थ इतुकाची काढीला।। विठोबाशी शरण जावे। निज निष्ठे नाम घ्यावे? वेदांचे सार अचूक आपल्यापुढे ठेवणाऱ्या तुकारामांच्या गाथेला म्हणूनच लोक पाचवा वेद म्हणतात.

क्रमश:

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article