वेदांता लि.ने हिंदुस्थान झिंकमधील हिस्सेदारी विकली
नवी दिल्ली :
अनिल अग्रवाल यांच्या मालकिची वेदांता लिमिटेड या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी लाभांश जाहीर केला आहे. आर्थिक वर्ष 2025-26 साठी 2737 कोटी रुपयांचा एकंदर लाभांश गुंतवणूकदारांच्या खिशात पडणार आहे.
प्रतिइक्वीटी समभाग 7 रुपयांप्रमाणे अंतरीम लाभांश संचालक मंडळांच्या बैठकीमध्ये बुधवारी मंजूर करण्यात आला आहे. 24 जून 2025 ही लाभांशाची रेकॉर्ड डेट आहे. याच दरम्यान वेदांता लि.ने सहकारी कंपनी हिंदुस्थान झिंक लि.मधील हिस्सेदारी विकली आहे. या विक्रीच्या माध्यमातून 3028 कोटी रुपये उभारण्यात आले आहेत. हिंदुस्थान झिंकमध्ये 66.7 दशलक्ष समभागांची विक्री वेदांताने केली आहे. या उभारलेल्या रकमेचा वापर कंपनी आर्थिक क्षमता वाढविण्याबरोबरच इतर गोष्टींसाठी करणार आहे. वेदांता कंपनीचे विलगीकरण होणार असून लवकरच विविध क्षेत्रांच्या कंपन्या वेगवेगळ्या स्थापन केल्या जाणार आहेत. वेदांताने व्यावसायिक वर्ष 2025 मध्ये आपल्या समभागधारकांना 17 हजार कोटी रुपयांचा लाभांश दिला होता, जो 43.5 रुपये प्रतिसमभाग या प्रमाणे दिला गेला होता. गेल्या चार वर्षांमध्ये पाहता कंपनीने आपल्या समभागधारकांना प्रतिसमभाग 200 रुपयांपेक्षा अधिक लाभांश वितरीत केला आहे.