Vazrai Waterfall: धुक्यामुळे चालकाचा ताबा सुटला, मिनी ट्रॅव्हल्स दरीत कोसळली अन्...
वजराई धबधब्याच्या परिसरातील दरीत मिनी ट्रॅव्हल्स गेल्याने अपघात
सातारा : जगप्रसिद्ध असलेल्या कास (सातारा) येथील वजराई धबधब्याच्या परिसरातील दरीत मिनी ट्रॅव्हल्स गेल्याने अपघात झाला. या अपघातात सांगली व कोल्हापूरहून आलेले तीन पर्यटक जखमी झाले आहेत. इतर पर्यटक सुखरूप असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
कास परिसरात फिरण्यासाठी कोल्हापूरहून 14 पर्यटक मिनी टॅव्हल्सने मंगळवारी सकाळी आले होते. सायंकाळी ते वजराई धबधबा परिसरातून जात असताना ट्रॅव्हल्स चालकाला धुक्यामुळे अंदाज आला नाही. तोच जवळ असलेल्या दरीत 15 ते 20 फूट ट्रॅव्हल्स खाली गेल्याने प्रवाशांनी आरडाओरडा केला.
अचानक घडलेल्या या घटनेने सर्वच पर्यटक घाबरले. परंतु चालकाने प्रसंगावधान राखत गाडीवर नियंत्रण मिळवले. यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेत रोहन गोविंद मेटकरी (वय 22, रा. झोरे, ता. आटपाडी, जि. सांगली), संग्राम संतोष देसाई (वय 20, आटपूर, रा. चंदगड, कोल्हापूर), अभिषेक चंद्रकात चौगुले (वय 21, रा. हिरवळ, जि. कोल्हापूर) हे जखमी झाले. या घटनेची माहिती स्थानिकांनी तालुका पोलिसांना दिली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी प्रवाशांना वाचवण्यासाठी शिवेंद्रराजे टेकर्स ग्रुपला बोलवण्यात आले. त्यांनी प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर जखमी तीन युवकांना तात्काळ जिल्हा शासकीय रूग्णालयात नेण्यात आले. त्यातील रोहन मेटकरी व संतोष देसाई यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर अभिषेक चौगुले याला डिस्चार्ज देण्यात आला आहे.
जिथे अपघात झाला तिथे अरूंद रस्ता, नागमोडी वळणे असल्याने चालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही. त्यातच कास, वजराई धबधबा परिसरात धुके मोठ्या प्रमाणात असल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. प्रशासनाने या रस्त्यावर सूचना फलक लावावेत, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. अधिक तपास तालुका पोलीस करत आहेत.