For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शहर परिसरात वटपौर्णिमा उत्साहात

11:05 AM Jun 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
शहर परिसरात वटपौर्णिमा उत्साहात
Advertisement

पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेचे व्रत आचरणात

Advertisement

बेळगाव : पतीच्या दीर्घायुष्यासाठी,त्याच्या निरोगी जीवनासाठी शहर परिसरातील सावित्रींनी शुक्रवारी मोठ्या श्रद्धेने व उत्साहात वटपौर्णिमेचे व्रत आचरणात आणले. पुराणकालीन कथेनुसार सावित्रीने यमाकडून सत्यवानाचे प्राण परत मिळविले. तत्पूर्वी तिने पतीला वटवृक्षाखाली झोपवले होते. वैज्ञानिकदृष्ट्या वटवृक्ष हा प्राणवायू देणारा वृक्ष आहे. त्यामुळे त्याच्या छायेखाली असणाऱ्या प्रत्येकाला अधिकाधिक प्राणवायू मिळतो. सत्यवान-सावित्रीची ही कथा मौखिक परंपरेतून पुढे आली आणि तेव्हापासून महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी या व्रताचे आचरण करत आहेत. शुक्रवारी सकाळपासूनच वटवृक्षाच्या सभोवती महिलांची गर्दी झाली. भारतीय आध्यात्मानुसार पुनर्जन्म असतो.

त्यामुळे सातजन्म हाच पती लाभावा व त्याला दीर्घायुष्य लाभावे, या भावनेने महिलांनी वटवृक्षाची पूजा केली. त्याला हळद-कुंकू वाहिला. फळफळावळांचा नैवेद्य दाखवून वटवृक्षाभोवती सात फेरे घालून धागा गुंडाळला. तसेच आलेल्या सुवासिनींची आंबा किंवा फणसाचे गरे घालून ओटी भरली. या व्रताचे औचित्य साधून बाजारपेठेतही वटसावित्रीच्या पूजेचे साहित्य दोन दिवसांआधीच दाखल झाले होते. फणी, हळद-कुंकू, मणीमंगळसूत्र, जोडवी, अशा सौभाग्यचिन्हांसह हिरव्या बांगड्या व गुंडाळण्याचा धागा, द्रोण विक्रीला आले होते. दरवर्षी पूजेच्या आदल्या दिवशी महिला या साहित्याची खरेदी करतात. परंतु, यंदा पावसाने या खरेदीवर विरजण पडले. त्यामुळे शुक्रवारी सकाळी साहित्याच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी झाली होती. तसेच वटसावित्रीच्या पूजेचा पटही विक्रीस उपलब्ध होता.

Advertisement

व्हॅक्सिन डेपो येथे महिलांची गर्दी

व्हॅक्सिन डेपो येथे असंख्य वटवृक्ष असल्याने तेथे महिलांनी गर्दी केली. याशिवाय शहापूर, कचेरी गल्लीतील गणपती मंदिरानजीक, समादेवी मंदिरानजीक, कित्तूर चन्नम्मा गणपती मंदिरानजीक, अनगोळ नाका येथील स्वयंभू गणपती मंदिर, आरटीओ सर्कल येथील हनुमान मंदिराच्या परिसरातील वटवृक्षाची पूजा करण्यासाठी महिला बहुसंख्येने आल्या होत्या.

Advertisement
Tags :

.