For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वटपौर्णिमेला मिळतेय आधुनिकतेची जोड

12:59 PM Jun 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
वटपौर्णिमेला मिळतेय आधुनिकतेची जोड
Advertisement

पतीच्या आरोग्य, दीर्घायुष्यासाठीचे व्रत : दोघांमधील प्रेमभाव वाढवणारा सण

Advertisement

पणजी : हिंदु संस्कृतीत अनेक सण आणि परंपरा समृद्ध आहेत. हे सण, उत्सव निसर्गचक्राशी, कृषिजन्य संस्कृतीशी जोडलेले आहेत. या उत्सवांमागे निश्चितपणे काही विशेष उद्देश आहे. त्यातीलच एक म्हणजे ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा. सावित्री सत्यवानाचे प्राण वाचवण्यासाठी यमलोकापर्यंत गेली. तेव्हापासून हे व्रत सुवासिनी आपल्या पतीला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे म्हणून करू लागल्या. असं या व्रताचं पौराणिक महत्त्व सांगितलं जातं. मात्र व्रत केल्याने नवऱ्याचे प्राण वाचतात हा भाबडेपणा तेव्हाही नव्हता आणि आजही नक्कीच नाही. पूर्वीच्या काळी बायकांना बाहेर पडायला मिळायचं नाही. सणाच्या निमित्ताने का होईना, त्या बाहेर पडायच्या. नटायला-मिरवायला मिळायचं. कित्येक महिला आजही या परंपरा जपतात.

एरव्ही जीन्स आणि शर्टमध्ये वावरणाऱ्या महिलाही यादिवशी मात्र छान साजश्रृंगार करून वडाभोवती प्रदक्षिणा घालताना दिसतात. व्रताची बदलती संकल्पना वटपौर्णिमेचा उपवास म्हणजे पतीसाठी, त्याच्या दीर्घायुष्यासाठी केलेले व्रत. परंतु बदलत्या काळानुसार या व्रताची संकल्पना बदलत गेलेली दिसते. लग्न झाल्यानंतर या व्रताचे औत्सुक्य होते आणि प्रत्येक नवविवाहितेला ते असतेच. पण हे व्रत म्हणजे दिवसभराचा अखंड उपवास असतो. परंतु आताच्या पिढीला हा दिवसभराचा अखंड उपवास झेपेल की नाही यावर शंका असते. त्यामुळे पुढे काही त्रास नको म्हणून डब्यात उपवासाचे पदार्थ तयार करून नेले जातात. आजच्या आधुनिक आणि यांत्रिक जीवनाला जखडून राहिलेल्या कमावत्या महिलांना शास्त्राsक्त पद्धतीने व्रत करणे शक्य होत नाही आणि परंपरापासून त्या पूर्णपणे दूरही जाऊ शकत नाहीत. त्यामुळे आपल्या सौभाग्यवृद्धीसाठी जे जे करता येईल ते ते करण्याचा प्रयत्न आजची स्त्राr करत असते.

Advertisement

वडाच्याऐवजी फांदीची पूजा

ज्या महिला वडाच्या फांद्या आणून पूजा करतात किंवा वडाच्या झाडाजवळ जाऊन वाण म्हणून मात्र पानाचा वापर करतात, त्यांचं काय? वटपौर्णिमा हा एक सण आहे आणि तो रूढी परंपरा जपत पूजा करून एकमेकींना भेटून खेळून मिसळून घालवला तर चालणार नाही का? रूढी परंपरा आधुनिक पद्धतीनंदेखील जपता येतात. त्यासाठी पर्यावरणाला हानी पोहचवण्याची खरंच गरज आहे का?

वटपौर्णिमा सोशल मीडियावर

वटपौर्णिमेच्या पूजेत तसेच इतर गोष्टीत आधुनिकीकरण आले आहे. तसेच या दिवसाच्या शुभेच्छा देण्याचा, एकमेकांना मेसेज करण्याचाही नवीन ट्रेंड आला आहे. वटपौर्णिमा जास्तत: सोशल मीडियावर गाजत आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सोशल मीडियावर वटपौर्णिमेनिमित्त विविध प्रकारचे जोक्स, तसेच स्टेट्स घालणेही सुरू केले आहे. पूजा करताना सेल्फी काढून हॅशटॅग करून स्टेट्स घालण्याचीही पॅशन सध्या सुरू आहे.

पर्यावरणाला हानी पोहचवू नका 

आज शहरात वटवृक्षाचे दर्शन होणे दुरापास्त झाले आहे. त्यात धावपळीचे जीवन आणि वेळेचा अभाव असल्यामुळे वडाकडे जाऊन पूजा करणे शक्य नसते. त्यामुळे बाजारातून वडाची फांदी खरेदी करून घरातच त्याची पूजा करण्यात स्त्रिया योग्य मानतात. यामुळे सणाचा मूळ हेतू दूरच राहतो उलट वटवृक्षांची छाटणी करून वातावरणातील वायुप्रदूषणाला आमंत्रण दिले जाते. वाढत्या इमारती आणि प्रदूषणाच्या विळख्यात पर्यावरणाची हानी होत चालली आहे. असं असताना वडाच्या फांद्या तोडून पूजा करण्यापेक्षा वडाच्या झाडाजवळ जाऊन थोडा मोकळा श्वास घ्यायची आजच्या स्त्रियांना गरज आहे असं वाटणाऱ्या स्त्रियाही बऱ्याच असतील. तर काहींना अजिबातच यामध्ये रस नाही. एकंदरीत ही दोन टोकं आहेत. व्रतवैकल्य करून एकमेकांवरचं प्रेम व्यक्त होतंच असं नाही.

वटवृक्षाची लागवड करा...

आधुनिकीकरणाच्या ओघात गावांचे आणि शहरांचे काँक्रिटीकरण झाल्याने वटवृक्षाचे अस्तित्व जवळपास संपत आले आहे. कुठेतरी दूरवर एखादा वटवृक्ष आढळतो आणि त्याची पूजा करण्यासाठी महिलांची रांगच रांग लागते. तसेच केवळ फांद्या आणून त्यांची पूजा करण्याऐवजी जागोजागी वटवृक्षाची किंवा अन्य वृक्षाची लागवड केली तर त्याचा फायदा नक्कीच होईल.

Advertisement
Tags :

.