For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आगरवाडेकरांचा यु टर्न, सरकार चौकशीवर ठाम

12:16 PM Jun 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
आगरवाडेकरांचा यु टर्न  सरकार चौकशीवर ठाम
Advertisement

आगरवाडेकरांकडून तक्रार मागे घेण्याचे प्रतिज्ञापत्र : तरीही सर्व दोषींवर कारवाई होणारच : मुख्यमंत्री

Advertisement

पणजी : आसगांव येथे आगरवाडेकर यांचे घर पाडल्याच्या प्रकरणात आगरवाडेकर कुटुंबीयांनी बुधवारी रात्री उशिरा अचानक यु टर्न घेतल्याने पत्रकार, सरकार तसेच त्यांना मदत करणाऱ्या सर्वांनाच आगरवाडेकर कुटुंबीयांनी गृहीत धरल्याचे स्पष्ट झाले आहे. संतापाची बाब म्हणजे आगरवाडेकर कुटुंबीयांनी तक्रार मागे घेण्यासाठी उत्तर गोवा पोलीस अधीक्षकांकडे रितसर प्रतिज्ञापत्रही सादर केले आहे. त्यामुळे आगरवाडेकर यांनी सरकार तसेच गोमंतकीयांचा विश्वासघात केल्यासारखेच झाले आहे. मात्र याप्रकरणी सरकार गप्प बसणार नाही. सर्व गुंडांना अटक करून आत टाकले जाईल. पूजा शर्मा हिचा पोलीस शोध घेत असून पोलीस पथके मुंबई व बेळगावला रवाना झालेली आहेत, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले. या प्रकरणात आगरवाडेकर कुटुंबाला कोणाशीही तडजोड करायची असेल किंवा सरकारकडून त्यांना घर नको असेल तर ती त्यांची मर्जी, परंतु या प्रकरणात सरकार गप्प बसणार नाही. घर पाडणाऱ्या सर्व गुंडांना आत टाकले जाईल. जे कोणी दोषी आहेत त्या सर्व जणांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

निरीक्षकासह तीन पोलिस निलंबित

Advertisement

आगरवाडेकर यांच्या घर पाडण्याच्या तपासकामाबाबत हयगय केल्याबद्दल हणजूण पोलीस स्थानकाच्या तीन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. त्यात पोलीस निरीक्षक प्रशल नाईक देसाई, उपनिरीक्षक संकेत पोखरे, आणि कॉन्स्टेबल नितीन नाईक यांचा समावेश आहे. हे प्रकरण गुन्हा अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) देण्यात आले असून गुन्हा अन्वेषण विभागाने या प्रकरणाचा तपास सुऊ केला आहे.

विशेष पथकाची स्थापना

सीआयडी अधीक्षक राहूल गुप्ता यांच्या देखरेखीखाली उपअधीक्षक राजेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक निनाद देऊलकर, लक्षी आमोणकर, विकास देयकर, या चार सदस्यीय विशेष तपास पथकाची स्थापना केली आली आहे.

वास्कोच्या अश्फाक कादीरला अटक

याप्रकरणी सीआयडीने धडक कारवाई करत प्राथमिक पुराव्यांच्या आधारे भादंसंच्या कलम 440, 447, 448, 352, 354, 143 147, 148 149, 120 अंतर्गत गुन्हा नोंद  केला आहे. तसेच सीआयडीने अश्फाक कादीर शेख (40 मांगूर वास्को) याला अटक केली आहे.

अश्फाकची हुंडाई क्रेटा कार जप्त 

अश्फाक कादीर याने या प्रकरणातील मुख्य संशयिताला पांढऱ्या रंगाची हुंडाई क्रेटा कार पुरविली होती. घटनेच्या ठिकाणाहून टिपलेल्या फुटेजमध्ये हेच वाहन कैद झाले आहे. सदर वाहनही जप्त करण्यात आले आहे.

कुठ्ठाळी, वास्कोच्या बाऊन्सरना अटक 

तसेच घटनास्थळी बाऊन्सर म्हणून हजर असलेल्या आणखी दोन संशयितांना सीआयडीने अटक केली आहे. त्यात मोहम्मद इमरान सलमानी (34, कुठ्ठाळी), अजीम कादर शेख (34 वास्को) यांचा समावेश आहे. टोयोटा इनोव्हा जीए- 09, ए 9 एक्स एक्स 3 ही कार देखील सीआयडीने जप्त केली आहे. सीआयडी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास जलद गतीने करणे सुऊ केले असून या प्रकरणातील संशयितांना अटक करण्याचे काम युद्धपातळवर सुऊ आहे. सीआयडी पोलीस पुढील तपास करीत आहे.

Advertisement
Tags :

.