For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तालुक्यात वटपौर्णिमा उत्साहात साजरी

11:20 AM Jun 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
तालुक्यात वटपौर्णिमा उत्साहात साजरी
Advertisement

पतीला दीर्घायुष्य लाभो-जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून सुवासिनींकडून वडाची मनोभावे पूजा

Advertisement

वार्ताहर/किणये 

तालुक्यात मंगळवारी वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पतीला दीर्घायुष्य लाभावे व जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून सुवासिनी महिलांनी वडाची मनोभावे पूजा केली. ग्रामीण भागात सणवार, व्रतवैकल्याला फार महत्त्व आहे. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी करण्याची परंपरा आहे. त्यानुसार मंगळवारी तालुक्याच्या गावागावांमध्ये महिला वटपौर्णिमा साजरी करताना दिसल्या. सावित्रीने आपल्या पतीला परत आणण्यासाठी वटवृक्षाखाली बसून कठोर तपश्चर्या केली. यामुळे यमराजाला तिचा पती परत द्यावा लागला, अशी ही सत्यवान सावित्रीची कथा आहे.

Advertisement

त्यामुळे आजच्याही सौभाग्यवतींनी साता जन्माची गाठ वटवृक्षाला बांधली आणि जन्मोजन्मी हाच पती मिळावा, अशी याचना केली. सुवासिनी महिला मंगळवारी सकाळपासूनच शृंगार करून हातामध्ये पूजेसाठी लागणारे साहित्य घेऊन जाताना दिसत होत्या. वटवृक्षाला केळी, फणसाचे गरे, आंबा, फणस, जांभूळ आदींसह विविध प्रकारची फळे ठेवून नैवेद्य दाखविला व एकमेकांना हळदीकुंकू करताना दिसत होत्या. माणसाच्या आयुष्यात पती आणि पत्नी यांचे नाते हे अतूट असे आहे. सौभाग्यवती महिला नेहमीच आपल्या पतीरायाची काळजी करत असतात. त्याला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे यासाठी त्यांनी मंगळवारी उपवास करून वटवृक्षाची पूजा केली.

पिरनवाडी

पिरनवाडी येथील बिरदेव मंदिराजवळील वटवृक्षासमोर महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली पहावयास मिळाली. तसेच मच्छे येथील डिवाईन मर्सी शाळेच्या मागे, बेळगाव खानापूर महामार्ग श्रीनिवास कंपनीजवळ तसेच मच्छे गावातील अनेक वटवृर्क्षजवळ महिला पूजा करताना दिसत होत्या.

विजयनगर गणेशपूर 

विजयनगर गणेशपूर येथे महिलांनी वटपौर्णिमेनिमित्त शिवाजी बाडीवाले यांच्या घरासमोर वटवृक्षाच्या रोपाची लागवड केली आणि त्याची पूजा करून याच वटवृक्षाची पूजा करून एक पर्यावरणपूरक संदेश दिला. याचबरोबर वाघवडे, संतिबस्तवाड, कावळेवाडी, बिजगर्णी, इनाम बडस, बाकनुर, बाची, बामणवाडी, बाळगमट्टी, देसूर, जानेवाडी, नावगे, किणये, रणकुंडये, बेळगुंदी, बस्तवाड, हलगा भगात वटपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.

कंग्राळी बुद्रुक 

सातजन्मी हाच पती मिळू दे, माझ्या नवऱ्याला दीर्घायुष्य लाभू देत, अशी सुखी संसाराची भावना उराशी बाळगून कंग्राळी बुद्रुक, कंग्राळी खुर्द, अलतगा, यमनापूर, गौंडवाड परिसरातील सुवासिनींनी वडाच्या पवित्र झाडाला पांढरा धागा गुंडाळून सात फेऱ्या मारुन मोठ्या भक्तीभावाने मंगळवारी वटपौर्णिमा साजरी केली. देवी सावित्रीने आपल्या पती सत्यवानला आपल्या पतीव्रतेच्या ताकदीवर परत जीवंत करण्यास भाग पाडले होते. त्या देवी सावित्रीला स्मरुन सर्व सुवासिनींनी आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभण्याची प्रार्थना केली. मंगळवारी सकाळपासूनच कंग्राळी किर्यात परिसरातील सुवासिनींचा सर्व पेहराव करून आपापल्या गावातील पवित्र वडाच्या झाडाला पांढरा धागा गुंडाळून सात प्रदक्षिणा घालून आपली मनोकामना पूर्ण केली.

उचगाव परिसर

जून महिन्यातील ज्येष्ठ शुक्ल पक्षातील येणाऱ्या वटपौर्णिमेचे औचित्य साधून उचगाव परिसरातील प्रत्येक गावामधील गावाच्या सभोवती असलेल्या वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालून असंख्य सुवासिनींनी  वटपौर्णिमेचा सण उत्साही वातावरणात साजरा केला. सातजन्मी हाच नवरा मिळू दे... अशाप्रकारची संकल्पना करत वडाच्या झाडाला दोरा गुंडाळून वटपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. उचगाव परिसरातील सुळगा, बेनकनहळ्ळी, कल्लेहोळ, तुरमुरी, बाची, कोणेवाडी, उचगाव, बसुर्ते, बेकिनकेरे, अतिवाड, गोजगा गावाशेजारी असलेल्या वडाच्या झाडाकडे सुवासिनींची सकाळपासून गर्दी येत होती. वटपौर्णिमेदिवशी महिलांनी वडाच्या झाडाला दोरा गुंडाळून मनोभावे पूजा केली.

येळळूर येथे वटपौर्णिमा साजरी

येळळूर येथे प्रतिवर्षीप्रमाणे वटपौर्णिमा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. गावातील महिलावर्गाने जन्मोजन्मी हाच पती मिळावा, अशी मागणी करत वडाच्या झाडाला धागा गुंडाळात फेर धरला. यानिमित्त वडाची ओटी भरून फळांचे वाटप करण्यात आले. सुवासिनीनी वडाची पुजा करून आपले सौभाग्याचे व्रत पूर्ण केले. या सणाचे एक वेगळेच महत्त्व स्त्रियांच्या जीवनात आहे. यावेळी त्यांनी एकमेकीना शुभेच्छा दिल्या. वटपौर्णिमेचे औचित्य साधत महिलावर्गाने मोठा शृंगार करून नटूनथटून औक्षण केले. यावेळी वटवृक्षाखाली एक वेगळीच अनुभुती येऊन महिलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडत होता. महिलांची गर्दीही लक्षणीय होती.

बसवण कुडची, निलजी, शिंदोळी, मुतगा, सांबरा, बाळेकुंद्रीमध्ये पूजेसाठी सुवासिनींची गर्दी

तालुक्याच्या पूर्व भागांमध्ये मंगळवारी सुवासिनीनी वटपौर्णिमेचे व्रत उत्साहात साजरे केले. पूर्व भागातील बसवण कुडची, निलजी, बसरीकट्टी, शिंदोळी, मुतगा, सांबरा, बाळेकुंद्री खुर्द, होनिहाळ, मोदगा, सुळेभावी आदि भागांमध्ये सकाळपासूनच वडाच्या झाडाकडे सुवासिनींची गर्दी होती. सुवासिनी आपल्या पतीला उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभावे, तसेच हाच पती जन्मोजन्मी मिळावा ही मनोमनी कामना करून व्रत पूर्ण करताना पहावयास मिळाले.

Advertisement
Tags :

.