भात-गवत गंज्यांना आग लागल्याने शेतकऱ्याला दीड लाखाचा फटका
राजहंसगड शिवारात शनिवारी दुपारी घडली घटना
प्रतिनिधी/ बेळगाव
राजहंसगड शिवारातील गवत गंज्यांना आग लागून एका शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. गर्लगुंजी क्रॉस-नंदिहळ्ळी रोडवर शनिवारी दुपारी ही घटना घडली असून शेतकऱ्याला आर्थिक फटका बसला आहे. शिवाय चारा जळाल्यामुळे जनावरांचीही उपासमार होणार आहे.
प्रकाश रघुनाथ थोरवत यांच्या शेतात ही घटना घडली आहे. कच्च्या भाताच्या दोन गंजी, गवताच्या दोन गंजी, करडची एक गंजी अशा पाच गंज्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत. सुमारे दीड लाख रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे. भाताच्या दोन गंज्यांची शनिवारी रात्री मळणी करण्यात येणार होती. सुमारे 30 पोतीहून अधिक भात होईल, अशी अपेक्षा होती. मळणी होण्याआधीच गवत गंज्यांना लागलेल्या आगीत भातही जळून खाक झाले आहे. या रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांच्या सतर्कतेमुळे शेजारच्या गंज्यांचे संरक्षण केले. प्रकाश थोरवत यांच्या घरी तीन जनावरे आहेत. आगीत गवत जळून खाक झाल्यामुळे या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सरकारने या शेतकऱ्याला भरपाई द्यावी, अशी मागणी केली जात आहे.