मंगलमय पर्वामधील वसुबारस श्रद्धेने साजरी
शहर परिसरात गोवत्स द्वादशी श्रद्धेने : गायींसमोर गाणी म्हणण्याची काही ठिकाणी प्रथा
बेळगाव : भारतीय संस्कृतीने कृषी संस्कृतीला नेहमीच प्राधान्य दिले आहे. त्यामुळे निसर्गाप्रती, कृषी संस्कृतीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचे अनेक सण-उत्सव आपल्याला पाहायला मिळतात. दिवाळीच्या मंगलमय पर्वामधील वसुबारस ही अशीच एक परंपरा आहे. दिवाळीच्या सणाची सुरुवातच या वसुबारसने होते, ज्याला गोवत्स द्वादशी असेही म्हटले जाते. म्हणजेच गो-मातेचे पूजन या दिवशी महत्त्वाचे मानले गेले आहे. म्हणूनच ‘ज्याच्या घरी गाय त्याच्या घरी विठ्ठलाचे पाय’ असे म्हटले गेले आहे. शहर परिसरात प्रामुख्याने ग्रामीण भागात वसुबारस मोठ्या श्रद्धेने साजरी करण्यात आली.
ज्यांच्या घरी गायी, म्हशी आहेत त्यांनी सकाळी गोठा सारवून तेथे रांगोळ्या रेखाटल्या. गायींना सजवून त्यांच्या गळ्यात झेंडूच्या फुलांच्या माळाही घातल्या. या दिवशी गृहिणींनी पूर्ण दिवस उपवास करून संध्याकाळी नवीन वस्त्रs परिधान करून गायींची आरती केली. गोठ्यात पणती लावण्यात आल्या. गायींना जोंधळा किंवा बाजरी गुळात कालवून ते खायला देण्यात आले. काही भागामध्ये आजही याच दिवशी गायींसमोर विविध गाणी म्हणण्याची प्रथा आहे. याच दिवशी गुराखी दिवटी घेऊन घरोघरी फिरतात. लोक या दिवटीमध्ये तेल घालतात. शहरात गायींची संख्या कमी झाली आहे. तथापि, गवळीवाड्यामध्ये जाऊन महिलांनी पूजा केली. काही जणांनी गो-शाळेत जाऊन साहाय्य केले.
हट्टीहोळ गल्ली
दिवाळी सणाचा पहिला दिवस वसुबारसने साजरा होतो. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही हट्टीहोळ गल्ली येथील बुरजाई देवी मंदिरासमोर गाय व वासरू यांची पूजा करण्यात आली. त्याचबरोबर बुरजाई देवीचीही पूजा करण्यात आली. वर्षभर शेतकरी शेतात जनावरांसोबत काबाडकष्ट करतात. त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा होतो. यावेळी माजी महापौर महेश नाईक, रतन मुगळीकर, सुभाष गवळी, सूरज गवळी, किरण गवळी, सविता मुगळीकर व नागरिक उपस्थित होते.