वरुणराजा आता पुरे कर; बळीराजाची आर्त हाक
निसर्गाची अवकृपा : परतीचा पाऊस सुरूच
वार्ताहर /किणये
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच तालुक्यातील बळीराजाही संकटात सापडला आहे. सतत होणाऱ्या परतीच्या पावसामुळे शेतशिवारातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पाऊस कमी होईल, अशी आस धरून राहिलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात परतीच्या पावसाने अक्षरशा पाणी आणले आहे. कारण हातातोंडाला आलेली पिके जमीनदोस्त होऊ लागली आहेत. बुधवारी सायंकाळी तालुक्यात परतीचा मुसळधार असा पाऊस झाला. यामुळे अवघा तालुका गारठून गेला आहे. परतीच्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे वरुणराजा कृपा कर, अशी आर्त हाक शेतकरी देऊ लागले आहेत.
मान्सून काळात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बेळगाव जिह्याचा दौरा केला. यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले. काही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली. मात्र बहुतांशी प्रमाणात तालुक्यातील शेतकरी अध्यापही नुकसान भरपाईपासून वंचित आहेत. मान्सून कालावधीत मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. यामुळे बऱ्याच पिकांचे नुकसान झाले. यानंतरच्या कालावधीत पावसाने थोड्या प्रमाणात विश्रांती घेतल्यानंतर काही उर्वरित राहिलेली पिके शेतकऱ्यांनी कशीबशी करून वाढविली. त्यांची जोपासना केली. आता याच पिकांचा सुगी हंगाम जवळ आला आहे. भात पोसवणीला सुऊवात झालेली आहे. सोयाबीन काढणी, भुईमूग काढणी आदी कामे सुरू आहेत. मात्र पावसामुळे ही सर्व कामे खोळंबली आहेत.
आठ दिवसांपासून परतीचा पाऊस
गेल्या आठ दिवसांपासून परतीचा पाऊस सुरूच आहे. बुधवारी सकाळी तालुक्याच्या काही भागात परतीचा पाऊस झाला. तर दुपारी पावसाने उघडीप दिली होती. मात्र सायंकाळी पुन्हा जोरदार पाऊस झाल्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. तसेच शेतशिवारातही मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. शिवारातील हातातोंडाला आलेली पिके जमीनदोस्त झाली आहेत. यामुळे यंदाच्या शेतकऱ्यांचे जगणे मुश्कील केले आहे.