वरुण तोमरला दुहेरी मुकुट
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विद्यमान आशियाई चॅम्पियन वरुण तोमरने 67 व्या राष्ट्रीय नेमबाजी चॅम्पियनशिपमध्ये वरिष्ठ व कनिष्ठांच्या पुरुषांच्या 10 मी. एअर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदके पटकावत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
सेनादलाच्या या 21 वर्षीय नेमबाजाने वरिष्ठ गटातील अंतिम फेरीत अडखळत सुरुवात केल्यानंतर शानदार प्रदर्शन करीत पहिले राष्ट्रीय विजेतेपद मिळविले. त्याचाच सहकारी प्रद्युम्न सिंग केवळ 0.8 गुणांनी मागे पडल्याने त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. राजस्थानच्या आकाश भारद्वाजने कांस्यपदक मिळविले. तोमरने नंतर कनिष्ठ विभागातील अंतिम फेरीत संथ सुरुवात केल्यानंतर उत्तर प्रदेशच्या निखिल सरोहावर मात करीत सुवर्ण घेतले. प्रद्युम्नला या विभागात कांस्यपदक मिळाले. वरिष्ठ विभागातील अंतिम फेरीत तोमरने 238 तर कनिष्ठ विभागातील अंतिम फेरीत त्याने 246.2 गुण नोंदवले. या राष्ट्रीय स्पर्धेत हरयाणा, राजस्थान व महाराष्ट्र यांनी पहिले तीन क्रमांक मिळविताना अनुक्रमे 23, 22, 13 सुवर्णपदके पटकावली.