वरुण चक्रवर्तीचा पंजा, टीम इंडियाने उडवला किवीजचा धुव्वा
भारताचा 44 धावांनी विजय : सेमीफायनलमध्ये आता कांगारुंचे आव्हान
वृत्तसंस्था/ दुबई
श्रेयस अय्यरची 79 धावांची खेळी, सामनावीर वरुण चक्रवर्तीचे 5 विकेट्स व फिरकीपटूंची भेदक गोलंदाजी या जोरावर भारताने न्यूझीलंडला नमवत 44 धावांनी मोठा विजय नोंदवला. भारताच्या फिरकीपटू चौकडीने 9 विकेट्स घेत किवीच्या धावांना वेसण घातले. या विजयासह भारताने गुणतालिकेत पहिले स्थान गाठलं आहे. टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीत गट टप्प्यातील तिन्ही सामने जिंकत उपांत्य फेरीत पोहोचला आहे. आता, 4 मार्चला टीम इंडियाचा उपांत्य फेरीचा सामना ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळवला जाईल. तर 5 मार्च रोजी न्यूझीलंड व दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसरी सेमीफायनल होणार आहे.
दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर रविवारी 2 मार्च रोजी खेळल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाने निर्धारित 50 षटकांत 9 बाद 249 धावा केल्या. यानंतर विजयी लक्ष्याचा पाठलाग करत भारतीय फिरकीपटूसमोर न्यूझीलंडचा संघ 205 धावांत ऑलआऊट झाला. 5 बळी घेणाऱ्या वरुण चक्रवर्तीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

टीम इंडियाने रोखला किवीजचा विजयरथ
भारताने दिलेले 250 धावांचे लक्ष्य न्यूझीलंड सहज गाठेल असं वाटत होते. पण भारताने मोठी खेळी करत 4 फिरकीपटू खेळवले आणि किवी संघ फिरकीसमोर फेल ठरले. न्यूझीलंडचा स्टार फलंदाज केन विल्यम्सनने सर्वाधिक 120 चेंडूत 7 चौकारांसह 81 धावा केल्या. इतर कोणताही किवीज फलंदाज 30 धावांचा टप्पा गाठू शकला नाही. भारताच्या फिरकी गोलंदाजांनी किवी संघाला एकेका धावेसाठी मेहनत करायला लावली. अखेरीस भारताने न्यूझीलंडला सर्वबाद करत 44 धावांनी विजय नोंदवला. भारताकडून वरूण चक्रवर्तीने 42 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. तर अक्षर, जडेजा, हार्दिकने प्रत्येकी 1-1 विकेट तर कुलदीपने 2 विकेट्स घेतल्या.
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात खराब झालेली पाहायला मिळाली. कर्णधार रोहित शर्मा व शुभमन गिलने टीम इंडियाच्या डावाची सुरुवात केली. पण अवघ्या 2 धावांवर मॅट हेन्रीने गिलला पायचीत केले. यानंतर सहाव्या षटकांत रोहित शर्मा 15 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. दिग्गज फलंदाज विराट कोहलीलाही मोठी खेळी करता आली नाही. मॅट हेन्रीच्या गोलंदाजीवर फिलिप्सने एका हाताने सूर मारत झेल घेऊन विराटला माघारी धाडले.
श्रेयसचे अर्धशतक, अक्षरची संयमी खेळी
सलामीचे तीन फलंदाज झटपट बाद झाल्याने टीम इंडियाची 3 बाद 30 अशी स्थिती झाली होती. पण, श्रेयस अय्यर व अक्षर पटेल यांनी चौथ्या गड्यासाठी 98 धावांची भक्कम भागीदारी करत संघाचा डाव सावरला. या दोघांनीही सुरुवातीला संयमी फलंदाजी केल्यानंतर धावांचा वेग वाढवला. यादरम्यान, श्रेयस अय्यरने अर्धशतकी खेळी साकारताना 98 चेंडूत 4 चौकार व 2 षटकारासह 79 धावांची खेळी केली. अक्षर पटेलने 61 चेंडूत 42 धावा करत श्रेयसला मोलाची साथ दिली. ही जोडी मैदानात स्थिरावलेली असताना अक्षरला रचिन रविंद्रने बाद केले.
यानंतर श्रेयसने केएल राहुलसोबत संघाचा डाव पुढे नेला. पण, 37 व्या षटकांत श्रेयसला 79 धावांवर बाद करत ओरुकेने न्यूझीलंडला मोठे यश मिळवून दिले. केएल राहुल 23 धावा करुन बाद झाला तर जडेजाला 16 धावा करता आल्या. हार्दिकने मात्र शेवटच्या काही षटकांत फटकेबाजी केल्यामुळे टीम इंडियाला 9 बाद 249 धावापर्यंत मजल मारता आली. हार्दिकने 45 चेंडूत 4 चौकार व 2 षटकारासह 45 धावा फटकावल्या. न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने शानदार गोलंदाजी करताना 42 धावांत 5 विकेट्स घेतल्या.
संक्षिप्त धावफलक
भारत 50 षटकांत 9 बाद 249 (रोहित शर्मा 15, शुभमन गिल 2, विराट कोहली 11, श्रेयस अय्यर 79, अक्षर पटेल 42, केएल राहुल 23, हार्दिक पंड्या 45, रविंद्र जडेजा 16, मोहम्मद शमी 5, कुलदीप यादव नाबाद 1, मॅट हेन्री 42 धावांत 5 बळी, जेमिसन, ओरुके, सँटेनर व रविंद्र प्रत्येकी एक बळी)
न्यूझीलंड 43.5 षटकांत सर्वबाद 205 (विल यंग 22, केन विल्यम्सन 81, डॅरिल मिचेल 17, सँटेनर 28, वरुण चक्रवर्ती 42 धावांत 5 बळी, कुलदीप यादव 2 बळी, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा 1 बळी).
‘उडता’ ग्लेन फिलिप्स! विराटसह अनुष्काही शॉक्ड
टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज सातव्या षटकांत 11 धावा काढून बाद झाला. आपला 300 वा वनडे सामना खेळत असलेला विराट एका आश्चर्यचकित झेलमुळे झेलबाद झाला. न्यूझीलंडचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक असलेल्या ग्लेन फिलिप्सने घेतलेल्या अनपेक्षित झेलने विराटसह संपूर्ण भारतीयांच्या मोठी खेळी पाहण्याच्या आशा संपुष्टात आल्या. विशेष म्हणजे, ग्लेन फिलिप्सने घेतलेला हा कॅच स्पर्धेतील आतापर्यंतच्या सर्वोत्तम कॅचेसपैकी एक आहे. सोशल मीडियावर या कॅचचा व्हिडीओ तुफान व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे.
मॅट हेन्री टीम इंडियाच्या डावातील 7 वे षटक टाकण्यासाठी आला होता. या षटकाच्या चौथ्या चेंडूवर विराटने बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने हवेत फटका लगावला. तिथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या ग्लेन फिलिप्सच्या दिशेने चेंडू हवेत गेला आणि त्याने हवेत उजव्या बाजूला झेप घेत नेत्रदीपक झेल टिपला. 0.62 सेकंदात फिलिप्सने रिअॅक्ट करत हा झेल टिपला.
एकमेवद्वितीय! किंग कोहलीचा आणखी विक्रमी धमाका
विराट कोहलीने रविवारी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात मैदानावर पाऊल ठेवताच क्रिकेट इतिहासात आपले नाव कोरले आहे. विराटचा एकदिवसीय क्रिकेटमधील हा 300 वा सामना ठरला आहे. याचबरोबर विराट कोहली 300 एकदिवसीय सामन्यांचा टप्पा ओलांडणारा 7 वा भारतीय आणि एकूण 18 वा क्रिकेटपटू ठरला आहे. 300 व्या एकदिवसीय सामन्यांबरोबरच, कोहली किमान 100 कसोटी आणि 100 टी 20 सामने खेळणारा जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. आतापर्यंत एकूण 18 क्रिकेटपटूंनी आपापल्या देशांसाठी 300 एकदिवसीय सामने खेळले आहेत परंतु त्यापैकी कोणीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील इतर दोन्ही स्वरुपात 100 सामने खेळलेले नाहीत.
भारत-ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड-द.आफ्रिका आमनेसामने
रविवार 2 मार्च रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या शेवटच्या गट सामन्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. उपांत्य फेरीसाठी चार संघ आधीच निश्चित झाले होते पण आता कोणता संघ कोणाविरुद्ध खेळेल हे पाहणे बाकी होते. न्यूझीलंडला भारताने पराभूत केल्यानंतर उपांत्य फेरीच्या लढती जाहीर झाल्या आहेत. ब गटात दक्षिण आफ्रिकेने पहिले स्थान मिळवले होते, तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर होता. टीम इंडियाच्या विजयामुळे आता चित्र स्पष्ट झाले आहे, जिथे भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होईल, तर न्यूझीलंडचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होईल.