तालुक्यात नागपंचमीनिमित्त वारूळाची पूजा
नागपंचमी सण उत्साहात-पारंपरिक पद्धतीने साजरा : विविध मंदिरांमध्ये भजन - इतर कार्यक्रमांचे आयोजन
वार्ताहर/किणये
तालुक्यात मंगळवारी नागपंचमी सण मोठ्या उत्साहात व पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. तालुक्यातील अनेक गावांमधील शिवमंदिरांमध्ये व नागदेवतेच्या मंर्देंमध्ये भाविकांनी विधिवत पूजा करून दर्शनाचा लाभ घेतला. शेतकऱ्यांनी शेत शिवार व परिसरातील वारुळांची विधिवत पूजा केली. महिला-मुलींनी झोपाळ्यावर बसून गाणी म्हणत आनंद साजरा केला. नागपंचमी सणानिमित्त गावागावातील मंदिरांमध्ये भजन व इतर आध्यात्मिक कार्यक्रम झाले. श्रावण महिन्यातील नागपंचमी हा पहिला सण ग्रामीण भागातील नागरिक वेगवेगळ्या व पारंपरिक पद्धतीने साजरा करतात. सोमवारी सायंकाळी गावागावांमधील लोहार व सुतार बंधुंकडून मातीने बनवलेल्या नागमूर्ती अळूच्या पानातून काही बालकांनी व नागरिकांनी घरी आणल्या. त्या नागमूर्तिची विधिवत पूजा करण्यात आली. लाह्या, दुधाचा नैवेद्य दाखवण्यात आला.
कलमेश्वर, रामेश्वर, सिद्धेश्वर आदी मंदिरांमध्येही विशेष पूजा
तालुक्याच्या अनेक गावातील मंदिरांच्या आजूबाजूला नागदेवतेच्या मूर्ती आहेत. या मूर्तींची मंगळवारी सकाळी अभिषेक करून पूजा करण्यात आली. दर्शनासाठी भक्तांनी दिवसभर गर्दी केली होती. तालुक्यात कलमेश्वर, रामेश्वर, सिद्धेश्वर आदी शिवस्वरूप पिंडी असलेल्या मंदिरांमध्येही नागपंचमीनिमित्त विशेष पूजा करण्यात आली. जानेवाडी गावातील शेतकऱ्यांनी गावाजवळील शिवारात वारुळाची मंगळवारी सकाळी सामूहिक पद्धतीने पूजा व आरती केली.नागपंचमीनिमित्त ग्रामीण भागात लाह्या, चिवडा, लाडू, तंबिट आदी फराळ बनवण्याची परंपरा आहे. नागपंचमीच्या सणानिमित्त ग्रामीण भागात झोपाळा झुलवण्याची परंपरा आहे. पाळणागीत गात महिला व मुली आनंद साजरा करीत होत्या. झाडाला किंवा घराच्या तुळईला दोरी बांधून गाणी गाताना महिला व मुली दिसल्या.
कर्ले येथील गावकऱ्यांकडून वारुळाची विशेष पूजा
कर्ले येथील गावकऱ्यांनी वारुळाची विशेष पूजा केली. यावेळी गुंडू खामकर यांनी पूजा केली. पिरनवाडी येथील बिरदेव मंदिरासमोर नागदेवतांच्या मूर्ती आहेत. या ठिकाणी पुजारी व मंदिर कमिटीतर्फे पूजा करण्यात आली. त्यानंतर पिरनवाडीसह परिसरातील महिलांनी नागदेवतेची पूजा केली.