बांदा-पानवळ येथील राम मंदिरात आज विविध धार्मिक कार्यक्रम
प्रतिनिधी
बांदा
श्री राम मंदिर प्रथम वर्धापनदिन तथा वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त शनिवार दिनांक ११ जानेवारी रोजी बांदा-पानवळ येथील श्री राम मंदिरामध्ये विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. समस्त विश्वातील भारतीयांचे आराध्य दैवत आणि श्रद्धास्थान, शक्तिस्थान असलेल्या प्रभू श्री रामचंद्र यांच्या अयोध्या येथील श्रीराम मंदिरात च्या प्रथम वर्धापन दिन तथा वर्षपूर्तीचे औचित्य साधून या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दिनांक ११ रोजी सकाळी ६ वाजता काकड आरती, सकाळी ७ ते ९ या वेळेत श्री राम व पंचायतन मुर्ती अभिषेक व महापुजा. सकाळी ९ ते १२ या वेळेत नामस्मरण, रामनाम जप व रामरक्षा पठण. सकाळी १२ ते १२.४५ पर्यंत आरती, शंखनाद व घंटानाद, दुपारी १२.४५ ते ३.३० पर्यंत महाप्रसाद, दुपारी ४ ते सायंकाळी ६ पर्यंत प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. कु. दुर्वा सावंत यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. त्यांना हार्मोनियम साथ रामचंद्र मेस्त्री, तबला साथ महेंद्र चव्हाण करणार आहेत. संध्याकाळी ६ ते ९ पर्यंत स्थानिक बांदा पंचक्रोशीतील महिला रामभक्तांची भजने व मंदिर परिसरात दीप प्रज्वलन होणार आहे. रात्रौ ९ नंतर मंदिरात धुपारती होणार आहे. श्री राम भक्तांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून श्री दर्शनाचा व धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन हिंदू जनजागृतीतर्फे करण्यात आले आहे.