आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम
आज कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन
खानापूर : आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या 63 व्या वाढदिवसानिमित्त महालक्ष्मी ग्रुप संचलित लैला साखर कारखान्याच्यावतीने सोमवार दि. 6 ते बुधवार दि. 8 जानेवारीपर्यंत विविध उपक्रम राबवून आमदार विठ्ठल हलगेकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त सोमवारी भव्य अशा कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार जगदीश शेट्टर, खासदार विश्वेश्वर हेगडे-कागेरी, इराण्णा कडाडी, आमदार शशिकला जोल्ले, माजी आमदार महांतेश कवटगीमठ, माजी आमदार अनिल बेनके, माजी आमदार सुनील हेगडे, माजी आमदार अरविंद पाटील, माजी आमदार दिगंबर पाटील, माजी आमदार अंजली निंबाळकर यांच्या उपस्थितीत होणार आहे.
सोमवारी सायंकाळी 7 वाजता जागर मराठी संस्कृतीचा हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. तसेच उद्योगविषयक मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यानंतर दुपारी 4 वाजता शांतीनिकेतन पब्लिक स्कूलचे स्नेहसंमेलन होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून दिनेशकुमार मिना हे उपस्थित राहणार आहेत. मंगळवार दि. 7 रोजी सकाळी 10 वाजता आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच शासकीय योजनांची माहिती मिळवून देण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शासकीय योजनांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच महालक्ष्मी ग्रुप गौरव सोहळ्याचे वितरण आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
बुधवार दि. 8 रोजी सकाळी 11 वाजता शेतकऱ्यांच्या मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून यात शेतकऱ्यांना ऊसपीक आणि लघू उद्योग व्यवसायानिमित्त मार्गदर्शन करण्यात येणार आहे. दुपारी 12 वाजता विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात प्रसिद्ध अभिनेते प्रसाद पंडित हे मार्गदर्शन करणार आहेत. यानंतर दुपारी 1 वाजता कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला आहे. तर दुपारी 4 वाजता शांतीनिकेतन पब्लिक स्कूलच्या नर्सरी ते चौथी आणि पदवीपूर्व महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कल्चरल असोसिएशन बेळगावचे अध्यक्ष अरविंद एल. कुलकर्णी हे मार्गदर्शन करणार आहेत. तरी शेतकऱ्यांनी, युवकांनी आणि नागरिकांनी आमदार हलगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्वागताध्यक्ष आणि लैला साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक सदानंद पाटील यांनी केले आहे.