विविध पोलीस स्थानकांचा अमलीपदार्थांविरुद्ध धडाका सुरूच
अँटीस्टॅबिंग स्क्वॉडचीही कारवाई
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव पोलिसांनी अमलीपदार्थ विक्रेत्यांविरुद्ध कारवाई तीव्र केली आहे. मार्केट, बेळगाव ग्रामीण व एपीएमसी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात छापे टाकून सव्वाकिलो गांजा व 2 ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
मार्केटचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल हावण्णावर व त्यांच्या सहकाऱ्यांनी उमेश सुरेश उरबिनट्टी, राहणार अक्कतंगेरहाळ याला भरतेशजवळ ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ 627 ग्रॅम गांजा, 4 हजार 90 रुपये रोख रक्कम, एक मोबाईल संच आढळून आला. पोलिसांनी त्याच्याजवळून 26 हजार 340 रुपये किमतीचे साहित्य जप्त केले. दुसरी कारवाई बेळगाव ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक आदित्य राजन व त्यांच्या सहकाऱ्यांनी पिरनवाडी जनता प्लॉटजवळ केली. वर्धमान अनंत कांबळे, पार्थ रमेश गोवेकर दोघेही राहणार सिद्धेश्वर गल्ली, पिरनवाडी या दोघा जणांना गांजा विकताना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळून 580 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. या दोघा जणांवर बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
एपीएमसी पोलिसांच्या अँटीस्टॅबिंग स्क्वॉडने शाहूनगर येथील रौडी शिटर राहुल जाधव याची तपासणी केली असता केए 22 ईके 3736 क्रमांकाच्या दुचाकीमध्ये हेरॉईनची 24 रिकामी पाकिटे व 2 ग्रॅम 20 मिली हेरॉईन आढळून आले. त्याच्यावर एपीएमसी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. चाकू हल्ल्याचे प्रकार रोखण्यासाठी सुरू केलेल्या तपासणीत शस्त्रास्त्रांबरोबरच अमलीपदार्थही आढळून येऊ लागले आहेत.