हल्लेखोर वकिलावर कारवाईसाठी विविध संघटनांचा मोर्चा
बेळगाव : काही दिवसांपूर्वी सरन्यायाधिशांवर सुनावणीदरम्यान एका वकिलाकडून हल्ला करण्यात आला. यामुळे विविध संघटनांकडून याचा निषेध करण्यात आला. दरम्यान शुक्रवारी दलित संघर्ष समिती (आंबेडकर वाद), राज्य चलवादी महासभा, दलित युवा संघटना यांच्याकडून या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. दलित संघर्ष समिती व चलवादी महासभेच्यावतीने राणी चन्नम्मा सर्कलमध्ये सदर वकिलाविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. प्रारंभी दलित संघर्ष समितीच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चा राणी चन्नम्मा सर्कलमध्ये आल्यानंतर मानवी साखळी करून निदर्शने करण्यात आली. यावेळी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. काहीकाळ आंदोलन केल्यानंतर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नेण्यात आला.
यावेळी त्या वकिलाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यामध्ये महिलांचाही मोठा सहभाग होता. भारत देश हा सार्वभौम असला तरी याचा दुरुपयोग करण्यात येत आहे. सदर वकिलाने सरन्यायाधिशांवर हल्ला करून देशाचा व संविधानाचा अपमान केला आहे. तसेच आम्हीही या घटनेचा निषेध व्यक्त करत आहोत. या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन हल्लेखोर वकिलाला त्वरित अटक करून त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले. यावेळी सिद्धप्पा कांबळे, महांतेश तळवार, शशी साळवी, लक्ष्मण कांबळे, दिनेश सुळगेकर, कल्लाप्पा नाईक, भरमा कांबळे, मल्लिकार्जुन राशिंगे, विराप्पा मादार, महांतेश पात्रदार, आनंद कोलकार, राजू शिंगे, महेश कोलकार, मल्लेश कुरंगी, सुनील बस्तवाडकर, भरत कोलकार, विठ्ठल तळवार यांच्यासह संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.