‘सेवा पखवडा’ निमित्त विविध उपक्रम
स्वच्छता, वृक्षरोपण, रक्तदान, शिबिरांचा समावेश : प्रदेशाध्यक्ष खासदार सदानंद तानावडे यांची माहिती
पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिनाचे औचित्य साधून देशभरात राबविण्यात आलेल्या ‘सेवा पखवडा’ स्वच्छता अभियानाचा भाग म्हणून गोव्यातही मंगळवारपासून स्वच्छतेसह आरोग्य शिबीर, प्रदर्शने, पुस्तकावर चर्चा, वृक्षरोपण, आदी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. दि. 2 ऑक्टोबर गांधी जयंतीपर्यंत हे कार्यक्रम राज्यभरात आयोजित करण्यात येणार आहेत, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सदानंद तानावडे यांनी दिली. बुधवारी पणजीत भाजप मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप सरचिटणीस दामू नाईक, दयानंद सोपटे, माजी खासदार अॅड. नरेंद्र सावईकर, उपाध्यक्ष सुवर्णा तेंडुलकर, प्रवक्ते प्रेमानंद म्हांबरे आदींची उपस्थिती होती. पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिनी दरवर्षी हा सेवा पखवडा आयोजित करण्यात येतो. यंदाही त्यानिमित्त राज्यभरात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यानुसार पहिल्या दिवशी पक्षाची उत्तर आणि दक्षिण गोवा कार्यालये तसेच मणिपाल इस्पितळ येथे रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. तसेच काल दि. 18 पासून सर्व मतदारसंघांमधून स्वच्छता अभियान प्रारंभ करण्यात आले. याच उपक्रमाचा भाग म्हणून 2024 च्या पॅरा ऑलिंम्पिकमध्ये आदर्श कामगिरी बजावलेल्या क्रीडापटूंचा गौरव करण्यात येईल. दि. 23 रोजी सर्व मतदारसंघांमधून वयोवृद्ध महिलांसाठी खास आरोग्य शिबिरे, पक्षाच्या उत्तर आणि दक्षिण गोवा कार्यालयात छायाचित्र प्रदर्शन, मोदी यांच्या जीवनचरित्रावर लिहिण्यात आलेल्या पुस्तकावर फोंडा, मडगाव, वास्को, पणजी आणि म्हापसा येथे परिसंवाद, जिल्हा स्तरावर चित्रकला, रांगोळी, वक्तृत्व, निबंध, वाळुशिल्प, ग्राफिक डिझाईन, प्रश्नमंजुषा आदी स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. त्याशिवाय प्रत्येक मतदारसंघात वृक्षरोपण, राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा, होणार आहेत.
‘सेवा पखवडा’ चा 2 रोजी समारोप
दि. 25 रोजी पंडित दिनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त बुथस्तरावर कार्यक्रम होतील. त्याच दरम्यान पक्षाच्या सदस्यता मोहिमेस अधिक गती देण्यासाठी दारोदारी भेट देण्याचे अभियान राबविण्यात येईल. दि. 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीदिनी सर्व मतदारसंघात विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊन या ‘सेवा पखवडा’ चा समारोप करण्यात येईल, अशी माहिती तानावडे यांनी दिली.
एकमेकांच्या विरोधात बोलू नका!
कोणत्याही मंत्र्याने आपल्या सहकारी मंत्र्याच्या खात्याविरोधात बोलू नये, पक्षहितास बाधक ठरेल असे वक्तव्य करू नये, अशी समज त्यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी दिली. सरकारमधील काही मंत्रीच एकमेकांच्या विरोधात बोलू लागले असल्याचा प्रकार तानावडे यांच्या निदर्शनास आणून देण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी वरीलप्रमाणे माहिती दिली. आज दि. 19 रोजी भाजपचे सर्व मंत्री, आमदार यांची विशेष बैठक भाजप मुख्यालयात आयोजित करण्यात आली आहे. त्यावेळी सदर विषय आपण उपस्थित करणार असून कोणत्याही मंत्र्याने दुसऱ्याच्या खात्यात ढवळढवळ करू नये, टीका टीप्पणी करू नये, अशी ताकीद त्यांना देणार आहे, असे तानावडे यांनी सांगितले.