मुख्यमंत्र्यांचा कडक पवित्रा
साबांखा तीस अभियंत्यांना नोटिसा : दक्षता खात्याकडून होणार चौकशी,27 कंत्राटदारांना नवी कामे नाहीत
पणजी : राज्यातील वाताहात झालेल्या खड्डेमय रस्त्यांची गंभीर दखल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री या नात्याने घेतली असून खराब रस्ते केल्याबद्दल खात्यातील 30 अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्या सर्वांना दंड ठोठावण्यात आला असून त्यांची दक्षता खाते चौकशी करणार आहे. कंत्राटे घेऊन खराब रस्ते देणाऱ्या आणि यापुर्वीच नोटिसा बजावण्यात आलेल्या 27 कंत्राटदारांना नवीन कामे मिळणार नाहीत. त्यांनी प्रथम खराब रस्ते दुऊस्त कऊन द्यावेत, असेही त्यांना डॉ. सावंत यांनी बजावले आहे. डॉ. सावंत यांनी स्वत: वरील माहिती दिली आहे. त्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याची बैठक घेतली आणि एकंदरित रस्त्यांच्या कामाची माहिती घेतली. रस्ते खराब कसे झाले? याची विचारणा त्यांनी अभियंत्यांना केली. तेव्हा बहुतेकजणांनी जादा पावसाचे कारण सांगितले. येत्या नोव्हेंबरपर्यंत सर्व रस्त्यांची दुऊस्ती करण्यात यावी अशी सूचना त्यांनी खात्यास केली असून तसे लक्ष्य संबंधितांना दिले आहे. आता अभियंत्यांच्या चौकशीमुळे त्यांच्यावर गंडांतर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कंत्राटदारांवर अंकूश ठेवावा
अनेक रस्ते विविध कामांसाठी खोदण्यात आल्यामुळे खराब झाले असून ते त्यांची दुऊस्ती करावी म्हणून खात्याने अंदाजपत्रक तयार करावे, असे डॉ. सावंत यांनी बजावले आहे. यापूर्वी काही अंदाजपत्रके चुकीची तयार करण्यात आली असून ती तयार केलेल्या अभियत्यांना देखील नोटिसा दिल्या जाणार असल्याचे डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले. खराब रस्त्यांच्या विषयावऊन त्यांनी अभियंत्यांची बरीच झाडाझडती घेतली. कंत्राटदारावर अंकूश ठेवा असेही त्यांनी अभियंत्यांना बजावले आहे.
गेल्या 20 वर्षांतील साबांखा मंत्री अपयशी
गेल्या 20 वर्षात जे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री होते ते पूर्णपणे अपयशी ठरले. त्यांनी खात्यास आणि रस्त्यांना न्याय दिला नाही म्हणून रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून परवाना घेतल्याशिवाय रस्ता खणल्यास लाखो ऊपयांचा दंड आकारला जाणार असल्याचा इशारा डॉ. सावंत यांनी दिला आहे. रस्ता बांधणीनंतर एक महिना तरी आधी त्यासाठी परवाना घेण्याची सूचना त्यांनी केली आहे.
परवाना न घेता रस्ते खोदल्यास कारवाई
गेल्या 20 वर्षात सार्वजनिक बांधकाम खात्यात जे बदल झाले नव्हते ते बदल आता आपल्या कार्यकाळात होत आहेत. खात्याला न सांगता, परवाना न घेता रस्ते खोदले तर कारवाई करण्याचा इशारा डॉ. सावंत यांनी दिला आहे. सदोष निर्णयासाठी अभियंत्यांना जबाबदार धऊन त्यांच्यावर कारवाई होईल, असे डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले.
ठाण मांडून बसलेल्या अभियंत्यांची बदली करणार
रस्ते खोदकामाचे शुल्क वाढवण्यात येणार असून सार्वजनिक बांधकाम खात्यातील रस्ता विभागात 5 वर्षापेक्षा अधिक काळ ठाण मांडून बसलेल्या अभियंत्यांची इतरत्र बदली करण्यात येणार असल्याचे डॉ. सावंत म्हणाले.