महालक्ष्मी ग्रुपतर्फे 6 पासून विविध उपक्रम
आमदार विठ्ठल हलगेकरांच्या वाढदिवसाचे निमित्त : कृषी प्रदर्शन भरवणार
प्रतिनिधी/ खानापूर
आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त महालक्ष्मी ग्रुप तोपिनकट्टीतर्फे दि. 6 ते दि. 8 जानेवारी असे तीन दिवस येथील शांतीनिकेतन पब्लिक स्कूल पटांगणावर विविध उपक्रम आयोजिले आहेत. यात कृषी प्रदर्शन, शेतकऱ्यांना मार्गदर्शन शासकीय योजनांची माहिती सर्वसामान्याना व्हावी, यासाठी मार्गदर्शन शिबिर फुडप्रोसेसिंग उद्योगाबाबत मार्गदर्शन तसेच दहावी, बारावी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन यासह विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच शांतीनिकेतन पब्लिक स्कूलचे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात येणार आहे. अशी माहिती लैला साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक सदानंद पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी खासदार विश्वेश्वर हेगडे-कागेरी, इराण्णा कडाडी, जगदीश शेट्टरसह भाजपचे नेते उपस्थित राहणार आहेत.
सदानंद पाटील म्हणाले, आमदार विठ्ठल हलगेकर यांचा वाढदिवस दि. 7 जानेवारी रोजी येथील शांतीनिकेतन पब्लिक स्कूलच्या पटांगणावर विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्त दि. 6 जानेवारीपासून तालुक्यातील शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांची माहिती व्हावी, यासाठी कृषी प्रदर्शन तसेच शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. विविध फलोत्पादन, शेतीतून उपलब्ध होणारी फळफळावळ यांच्यावर फुडप्रोसेसिंग करून उद्योग उभारण्यासाठी युवकाना मार्गदर्शन करणार आहेत.
7 रोजी आरोग्य शिबिर
वाढदिवसानिमित्त 7 रोजी दिवसभर केएलई हॉस्पिटल आणि महालक्ष्मी ग्रुपतर्फे आरोग्य शिबिर आयोजिले आहे.
जागर लोक सांस्कृतिक कार्यक्रम
यानिमित्त जागर लोक सांस्कृतिचा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती एम. डी. सदानंद पाटील यांनी दिली. यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर, तुकाराम हुंदरे, चांगाप्पा निलजकर, यल्लाप्पा तिरवीर, विठ्ठल करंबळकर, गुंडू पाखरे, राजू सिद्धाणी, तानाजी गोरल, भरमाणी पाटीलसह इतर होते.