Vari Pandharichi 2025: माझ्या वडिलांची मिराशी गा देवा। तुझी चरण सेवा पांडुरंगा।, संत सोपानकाका महाराजांच्या पालखीचे प्रस्थान
पहिल्या दिवशी पालखीचा मुक्काम पांगारे येथे आहे.
सासवड : द्वादशीला सकाळी समाधीची व पादुकांची महापूजा करण्यात आली. त्यानंतर संत सोपानदेव संस्थानतर्फे ज्ञानेश्वर माऊलींना नैवेद्य पाठवण्यात आला. सकाळी 11 वाजता संस्थान कार्यालयामध्ये सुवासिनींनी श्रींच्या पादुकांना औक्षण केले.
ज्येष्ठ वद्य द्वादशीला संत निवृत्तीनाथ महाराज समाधी दिवस असल्यामुळे मंडपात भजनाला सुरुवातीला निवृत्तीनाथ महाराजांचा अभंग म्हणण्यात आला. त्यानंतर माझ्या वडिलांची मिराशी गा देवा। तुझी चरण सेवा पांडुरंगा। हा प्रस्थानाचा अभंग झाला. हा अभंग म्हणून झाल्यावर श्रींच्या पादुका आणून पालखीत ठेवल्या. त्यानंतर प्रातिनिधीक स्वरूपात नारळ प्रसाद देऊन पालखीचे प्रस्थान झाले.
पहिल्या दिवशी पालखीचा मुक्काम पांगारे येथे आहे. आज पालखी रथाला पुष्पसजावट सजावट बाळासाहेब जगताप यांनी केली होती. श्रींच्या रथाची बैलजोडी विकास केंजळे यांची आहे. तर मानाचे दोन्ही अश्व अंजनगाव येथील अजित परकाळे यांचे आहेत. नगाराच्या गाडीची बैलजोडी नीरा येथील कुलकर्णी यांची असते. पांगारे वडकी निंबूत माळेगाव बारामती अकलूज मार्गे सोहळा पंढरपूरला जाणार आहे.
आज ज्येष्ठ वद्य द्वादशी रोजी संत सोपानकाका महाराजांच्या पालखीचे आषाढी वारीसाठी प्रस्थान झाले. काल जेष्ठ वद्य एकादशीला संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा सासवड मुक्कामी दाखल झाला. त्यामुळे सर्व सासवड नगरी भक्तीमय झाली होती.