Vari Pandharichi 2025: चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा। काय भुललासी वरलिया रंगा ।।
उच्चप्रतीची विठ्ठलभक्ती प्राप्त करणारा चोखामेळा विठ्ठलाचा सर्वश्रेष्ठ भक्त आहे.
By : मीरा उत्पात
ताशी : सामाजिक विषमतेमुळे दाहक मानहानीतून होणाऱ्या वेदनेचा हुंकार संत चोखामेळ्यांच्या
चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा । काय भुललासी वरलिया रंगा ।। या अभंगातून दिसून येतो. कनिष्ठ जातीत जन्माला येऊन उच्चप्रतीची विठ्ठलभक्ती प्राप्त करणारा चोखामेळा हा विठ्ठलाचा सर्वश्रेष्ठ भक्त आहे.
त्या काळात समाजात अनेक भेदाभेद होते. कनिष्ठ जातीतील लोकांना पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात जाण्याची बंदी होती. देवाला ही मानवनिर्मित बंदी मान्य नव्हती. तो फक्त भावभक्तीचा भुकेला होता. त्यामुळे चोखामेळ्याच्या निरपेक्ष वृत्तीने केलेल्या भक्तीवर प्रसन्न होऊन देव स्वत: चोखामेळ्याला नेहमी भेटत असे.
एकदा चोखामेळा देवाला भेटायला महाद्वारी आला. त्यावेळी देव गाभाऱ्यातून बाहेर आला. देवाने चोखामेळ्याला कडकडून मिठी मारली. आपल्या गळ्यातील रत्नहार आणि तुळशीची माळ चोखामेळ्याच्या गळ्यात घातली कपाळाला बुक्का लावला.
चोखा म्हणे कैसा हा नवलाव । देवाधिदेव वेडावला ।। असे चोखामेळ्याने ह्या प्रसंगाचे वर्णन केले आहे. देव चोखामेळ्यावर निरतिशय प्रेम करत होता, हे त्याच्या आयुष्यातील अनेक प्रसंगातून सिद्ध होते. एकदा मंगळवेढ्यातील कुलकर्णी ब्राह्मणाचे म्हातारे घोडे मेले. तेव्हा ते वाहून नेण्याचे काम एकट्या चोखोबाला शक्य होईना. तेव्हा त्याने देवाचा धावा केला.
विठ्ठल त्याच्या हाकेला धावून आला. दोघांनी घोडे वाहून गावाबाहेर नेऊन टाकले. चोखोबाला या कामाची दोन पायल्या ज्वारी मिळाली. त्याची निम्मी वाटणी विठ्ठलाला देण्यासाठी चोखा पंढरपूरला आला. येईपर्यंत रात्र झाली. रात्री देवानं त्याला महाद्वारातून आत नेले. पथी न राहणे उभे चल सख्या येथूनी झणी । असे म्हणून त्या हरी बसवी थेट सिंहासनी।। चोखोबा भेटायला आल्याची खूण म्हणून देवाने एक हाड चोखोबाच्या गाठोड्यात बांधून ठेवले.
सकाळी पुजारी देवळात आल्यावर त्यांना एक महार देवाजवळ बसलेला दिसला. आणि देवाच्या हातात चोखोबाच्या गाठोड्यातील हाड होते. पुजाऱ्यांनी चोखोबाला बाहेर हाकलून दिले. परंतु, देवाच्या हातातील हाड काही निघेना. अनेक उपाय केले तरी काही ते हाड निघाले नाही. तेव्हा पुजारी विठ्ठलाला शरण गेले. विठ्ठल म्हणाला
आणा माझ्या चोखोबासी।
तेव्हा सोडीन हडकासी।। मग चोखोबाला मंगळवेढ्याहून बोलावून आणले. चोखोबाने सांगितल्यावरच देवाने हातातील हाड टाकले.
असा चोखामेळ्याचा अधिकार होता. एवढा अधिकार असून सुद्धा सद्गुरूंशिवाय आपल्याजवळ असलेली अपूर्णता नाहीशी होत नाही. म्हणून देवाचे नित्य दर्शन होत असून देखील चोखामेळ्याने नामदेवांना आपले गुरू केले. चोखा म्हणे माझा धन्य गुरुराव। दाखविला देव हृदयी माझ्या।। चोखा म्हणे माझा नामदेव प्राण। घालीन लोटांगण जीवे भावे।। सद्गुरू कृपेमुळे आणि संतांच्या सहवासामुळे त्यांना द्वैत अद्वैत तत्त्वज्ञानाचे आकलन झाले.
चोखोबाला अक्षर ओळख नव्हती. त्यांच्या मुखातून आलेले अभंग अनंतभट नावाच्या ब्राह्मणाने लिहून ठेवले. त्यामुळे त्यांचे अभंग आज आपल्याला वाचायला मिळतात. असे हे चोखोबाराय! शुद्र जातीत जन्माला आले तरी निस्सीम भक्तीच्या बळावर त्यांना भगवद् प्राप्ती झाली आणि अत्त्युच्च अध्यात्मिक उंची गाठली!
वारकऱ्यांच्या ध्वजास पताका असे म्हणतात. ही पताका खादीच्या पांढऱ्या कापडापासून बनवतात. आयताकृती कापड समोर समोरच्या टोकांवर कापून तयार झालेले दोन त्रिकोण पुन्हा शिवून ही पताका बनवतात. पताका रंगवण्यास गेरूचा वापर करतात. पताकाची काठी वेळूची असते तर टोकाला रंगीत दोर गुंडाळून गोंडा बनवतात. वारीत चालताना पताका गुंडाळलेली, बांधलेली असते. मुक्काम जवळ आल्यावर पताका मोकळी सोडतात.