Vari Pandharichi 2025: पालखी विठोबा मंदिर... नावातच दडलाय इतिहास!, मंदिराला कसे पडले नाव?
माउलींच्या पालखीचा येथे दोन दिवस मुक्काम असतो.
By : सुकृत मोकाशी
पुणे : पुण्याच्या सांस्कृतिक व धार्मिक वारशाचा अविभाज्य भाग असलेले मंदिर म्हणजे भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिर. आळंदीतून संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर सोहळ्याचा पहिला मुक्काम पडतो, तो याच मंदिरात. म्हणूनच पालखी विठोबा या नावाने हे मंदिर ओळखले जात असल्याचा इतिहास सांगितला जातो. माउलींच्या पालखीचा येथे दोन दिवस मुक्काम असून, सध्या भक्तीचा सोहळाच भाविकांना अनुभवायला मिळत आहे.
संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे अलंकापुरीतून गुरुवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास प्रस्थान झाले. पहाटे पालखी आळंदीतून मार्गस्थ झाली. दिघी, कळस, विश्रांतीवाडी, फुलेनगरमार्गे शुक्रवारी सायंकाळी पालखी पुण्यात दाखल झाली. पुण्यातील भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात सोहळा मुक्कामी उतरला.
या पार्श्वभूमीवर मंदिराचे विश्वस्त प्रमोद बेंगऊट ‘तरुण भारत’शी बोलताना म्हणाले, की हे मंदिर केवळ श्रद्धास्थान नाही, तर इथला इतिहासही भक्तिभावाने नटलेला आहे. आषाढी वारी सुरू झाल्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा पहिला मुक्काम पुण्यात याच मंदिरात असतो. त्यामुळेच या मंदिराला ‘पालखी विठोबा मंदिर’ असे नाव पडले, असा इतिहास सांगितला जातो. हे पुरातन मंदिर आहे.
मंदिराच्या गाभाऱ्यात विठोबा आणि रुखमाईची दगडी मूर्ती आहे. पालखी जेव्हा येथे मुक्कामाला असते, तेव्हा येथे भक्त मोठ्या भक्तिभावाने दर्शनाला येत असतात. दिंड्याही मोठ्या प्रमाणात असतात. तेव्हा हा परिसर भक्तिमय वातावरणामध्ये न्हाऊन निघालेला असतो. परतीच्या वेळेसही माउलींची पालखी याच मंदिरामध्ये मुक्कामास असते.
पूर्वी पुण्याचे नाव पुनवडी होते. तसेच हे पेठांचे शहर म्हणून ओळखले जायचे. त्यामुळे पालखीसोबत येणारे लोक तेथे मुक्कामास असायचे. आत्ताचे भवानी पेठेतील टिंबर मार्केट आहे. तिथे पूर्वी मोकळे मैदान होते. तिथे बैल, घोडे बांधले जायचे तिथेच त्यांच्या चाऱ्याची व्यवस्था व्हायची. तसेच या भागात ‘डाळ मिल’ होत्या.
तिथे डाळ सावडून ठेवायचे. स्वच्छ करायचे. तिथे वारकऱ्यांची राहायची सोय होत होती. वारकरी संप्रदायाला मानणारा वर्ग या भागात आहे. त्यामुळे पालखी इथे उतरली की भक्तिमय वातावरण असते, असेही त्यांनी नमूद केले. तुकाराम महाराजांची सासूरवाडी याच भागातील आहे. या मंदिरात तुकाराम महाराजांची अनेक कीर्तने झाली आहेत, अशी आठवणही बेंगऊट यांनी यावेळी सांगितली.
पालखी सोहळ्याच्या निमित्ताने मंदिराची स्वच्छता, रंगरंगोटी
पालखी सोहळ्याच्या निमित्ताने मंदिरातील पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता तसेच मंदिराची रंगरंगोटी करण्यात आली आहे. देवांचे दागिने पॉलिश करण्यात आलेले आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. शुक्रवार आणि शनिवार असा दोन दिवस पालखीचा येथे मुक्काम असेल. रविवारी पालखी पुण्यातून मार्गस्थ होईल.