For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Vari Pandharichi 2025: पंढरीची वारी आहे माझे घरी। आणिक न करी तीर्थव्रत।। लागला टकळा पंढरीचा

04:40 PM Jun 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
vari pandharichi 2025  पंढरीची वारी आहे माझे घरी। आणिक न करी तीर्थव्रत।। लागला टकळा पंढरीचा
Advertisement

पंढरपूरला गेल्यावरही व एरवीही सतत ते नामस्मरण करत राहतात

Advertisement

By : ह.भ.प. अभय जगताप 

पंढरीची वारी आहे माझे घरी।

Advertisement

आणिक न करी तीर्थव्रत।।6

व्रत एकादशी करीन उपवासी।

गाईन अहर्निशी मुखी नाम।।

नाम विठोबाचे घेईन मी वाचे।

बीज कल्पांतीचे तुका म्हणे।।

- संत तुकाराम महाराज

आज जेष्ठ वद्य सप्तमी. देहूवरून तुकोबांच्या पालखीचे प्रस्थान होत आहे. तसेच पैठणवरून नाथ महाराजांच्या पालखीचेही आज प्रस्थान होणार आहे. त्र्यंबकेश्वरवरून संत निवृत्तीनाथ, कोथळी मुक्ताईनगर, जळगाव व मेहुण येथून संत मुक्ताबाई या पालख्या आधीच पंढरपूरच्या वाटेला निघाल्या आहेत.

आज आळंदीहून माऊलींची पालखी निघाली आणि आठवड्यात सासवडवरून सोपानदेव पिंपळनेर वरून निळोबारायांच्या पालखीचे प्रस्थान होईल. हरी पंढरीची वारी तिला वारकरी भाव विश्वात असलेले महत्त्व एकादशीचे व्रत श्रीक्षेत्र पंढरपूर वारकऱ्यांचे आराध्य दैवत पांडुरंग त्या देवाला भेटायला जाण्यासाठी केलेली वारी उत्सवाचा महत्त्वाचा दिवस म्हणजे एकादशी.

या सर्वाचं वर्णन, महिमा सर्व संतांनी विविध प्रकारे वर्णन केला आहे. सर्व वातावरण भक्तीने झालेले असताना आपणही या संत वचनांच्या आधारे वारी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात, करणार आहोत. तुकोबांचा जन्म पिढीजात वारकरी घराण्यामध्ये झाला होता. त्यांच्या घरामध्ये सात पिढ्यांपासून विठोबाची भक्ती प्रचलित होती. त्यांचे सातवे पूर्वज विश्वंभर बाबा पंढरीचे वारकरी होते.

पुढे वयानुसार तेव्हा देवाने त्यांना दृष्टांत दिला व त्यानुसार त्यांना त्यांच्या आमराईमध्ये विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती सापडल्या. या मूर्तीची पूजा त्यांच्या घरात सुरू होते अर्थात देहू येथे या मूर्तींची नित्य पूजा सुरू असली, तरी पंढरपूर हे क्षेत्राचे ठिकाण असल्यामुळे त्यांची वारीही सुरूच होती. तुकोबा बालपणी कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभे राहत, इतर मंडळी गात तेव्हा त्यांना साथ करत, संतांचे अभंग पाठ करत होते.

यासोबत पंढरीची वारीही सुरू होती. घरामध्ये चालत आलेल्या या वारीच्या व्रताचे वर्णन त्यांनी अभंगात केले आहे. महाराज म्हणतात, की आमच्या घरामध्ये ही पंढरीची वारी आहे व ही वारी असल्यामुळे मला अन्य कोणतेही तीर्थ अथवा व्रत करण्याची आवश्यकता नाही. पंढरपूर हेच एक तीर्थक्षेत्र, वारी हीच उपासना व एकादशी हेच एकमेव व्रत मी करतो, असे महाराज सांगतात.

एकादशी करत असताना, वारीमधे चालताना, पंढरपूरला गेल्यावरही व एरवीही सतत ते नामस्मरण करत राहतात. एवढे हे नामस्मरण वारकरी संप्रदायासाठी महत्त्वाचे आहे. वारकरी मंडळी रोज हरिपाठ म्हणतात ते हरिपाठामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे नामस्मरणाचा महिमा सांगितला आहे. अभंगाच्या शेवटी या विश्वाची निर्मिती पालन व प्रलय या तिन्हीसाठी कारणीभूत असलेल्या, तिन्ही गोष्टी ज्याच्या हातात आहेत त्या विठोबाचे नाम मी घेतो, असे महाराज म्हणतात.

Advertisement
Tags :

.