कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वरेण्या, भक्ताच्या प्रेमाचा मी भुकेला असतो

06:10 AM Apr 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अध्याय नववा

Advertisement

ढोंगी भक्तांच्या बाबत बाप्पा सांगत आहेत. ते म्हणाले, असे लोक वरकरणी भक्ती करण्याचं ढोंग करत असतात पण मनातून त्यांना स्वार्थ साधायचा असतो, प्रसिद्धी मिळवायची असते पण बाप्पांच्या दृष्टीने असे लोक त्यांच्या स्वार्थी वृत्तीने अत्यंत हलक्या दर्जाचे काम करत असतात. याउलट जो अत्यंत तन्मयतेने, मोठ्या भक्तिभावाने माझ्याशी अनुसंधान राखून असतो, अत्यंत प्रेमाने मला भजत असतो माझ्या प्रेमाशिवाय त्याला काहीही नको असते, तो त्याचा संसार चालवण्यासाठी जे काम त्याच्या वाट्याला आलेले असते ते अत्यंत हीन असले तरी मला तो उच्च वर्णीयांपेक्षाही श्रेष्ठ वाटतो. याबाबत वाल्या कोळ्याचे उदाहरण प्रसिद्धच आहे. आपण करत असलेल्या कृत्याचा पश्चाताप झाल्यावर त्याने अखंड रामनाम घेण्यास सुरुवात केली. त्या रामनामाच्या प्रभावाने त्याच्या वृत्तीत कमालीचा फरक पडला. त्याच्यावरील तमोगुणाचा प्रभाव कमी होऊन सत्वगुणाचा प्रभाव वाढला आणि वाल्याचा वाल्मिकी झाला. पुढे वाल्मिकी ऋषींनी रामायण लिहिले, त्यानंतर रामाचा अवतार होऊन भगवंतांनी वाल्मिकी ऋषींनी लिहिलेल्या संहितेनुसार वागून दाखवले. इतका वाल्मिकी ऋषींच्या भक्तीचा प्रभाव भगवंतांच्यावर पडला होता. थोडक्यात जसा भक्ताचा भाव असतो त्याप्रमाणात देव त्यांना आपलंसं करत असतो. पुढील श्लोकात बाप्पा वरेण्याला गणेशगीता सांगण्याच्यापूर्वी होऊन गेलेल्या भक्तांबद्दल गौरवोद्गार काढत आहेत. ते म्हणतात,

Advertisement

शुकाद्याऽ सनकाद्याश्च पुरा मुक्ता हि भक्तितऽ ।

भक्त्यैव मामनुप्राप्ता नारदाद्याश्चिरायुषऽ ।। 9 ।।

अर्थ- भक्तीच्या योगानेच शुक, सनक इत्यादि पूर्वी मुक्त झाले. नारद आदिकरून चिरायु मुनि भक्तीच्याच योगाने मजप्रत आले.

विवरण- बाप्पा म्हणतात, श्रेष्ठ पारमार्थिक शुक, सनक, नारद यांना भक्तीनेच मोक्षप्राप्ती झाली. भक्तीचे महात्म्य फार मोठे आहे. ते ज्याला पटले तो खरोखरीच भाग्यवान होय. लोक मोठमोठी देवळे, राऊळे बांधतात. त्यांना वाटते ती सोन्याचांदीने मढवली की मोठीच भक्ती केल्यासारखे आहे पण वरेण्या मी अनन्य भक्तीचा भुकेला आहे. मला ह्या असल्या बाह्य थाटमाटाची मुळीच अपेक्षा नाही. हे सारे माझेच वैभव आहे. लोक माझेच वैभव मला अर्पण करण्यात धन्यता मानतात. तुमचं स्वत:चं जे आहे ते तुम्ही मला अर्पण करावं अशी माझी अपेक्षा असते. तुमचा माझ्याबद्दलचा भक्तिभाव हा तुमचा स्वत:चा असतो तो मला अर्पण करा. मी तुमच्या प्रेमभावाचा भुकेला आहे. तुमची भक्ती, तुम्ही माझ्यावर करत असलेले निरपेक्ष प्रेम मला आवडते. त्याच्या तोलामोलाचे दुसरे काहीच नाही म्हणून मला तुमची भक्ती अर्पण करा म्हणजे मी तुमचा उध्दार करीन. माझ्याविषयी अनन्यता, माझ्यावरील अलोट प्रेम, देहबुद्धीचा त्याग, हे मला अपेक्षित आहे. ढोंगीपणा मला लगेच समजतो. कितीही मोठा शास्त्राr, पंडित झाला तरी भक्तीशिवाय त्याला माझी प्राप्ती होणार नाही हे लक्षात ठेव. महाअवधूत शिरोमणी शुकयोगी ब्रह्मलोक मिळवण्यापर्यंतची सिद्धी मिळवू शकले परंतु ब्रह्मलोकापर्यंत जरी साधक पोहोचला तरी त्याला ठराविक कालावधीनंतर माघारी परतावे लागते. हे लक्षात घेऊन, परिपूर्णता मिळवण्यासाठी ते त्यांचे पिताजी व्यासमुनींना शरण गेले आणि त्यांच्या उपदेशानुसार गणेशभक्ती करून पूर्णसिद्धी मिळवते झाले. विदेही सिध्दात, जनकराजा मुख्य म्हणता येईल. त्यालाही गर्व झाला होता. त्याचे गर्वहरण मी केले मग तो माझा भक्त होऊन योगी झाला. माझे परमभक्त कपिलमुनी भक्तीबलाने पूर्णसिद्धी मिळवते झाले. नारदांनी जी भक्ती केली ती अनुसरणीय होय. माझ्या उपासनेनेच त्यांनी मुक्ती मिळवली.

क्रमश:

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article