वंतिकाचा कॅटेरिना लॅग्नोला धक्का, दिव्याचीही इंजॅकवर मात
वृत्तसंस्था/ बटुमी (जॉर्जिया)
फिडे जागतिक महिला बुद्धिबळ चषक स्पर्धेच्या बाद टप्प्यात 32 स्पर्धक राहिलेले असताना वंतिकाने आपल्याहून बऱ्याच वरच्या क्रमांकावर विसावलेल्या लॅग्नोला पराभूत करून भारतीय महिला बुद्धिबळपटूंमधील आपल्या वेगाने वाढत्या स्थानाचे आणखी एक संकेत दिले. शनिवारी येथे झालेल्या अनुक्रमे रशियाच्या कॅटेरिना लॅग्नो आणि सर्बियाच्या तिओदोरा इंजॅकविऊद्धच्या तिसऱ्या फेरीतील पहिला गेम जिंकून भारतीय ग्रँडमास्टर्स वंतिका अग्रवाल आणि दिव्या देशमुख यांनी प्री-क्वार्टर फायनलमधील प्रवेशासाठीचे आपले दावे आणखी मजबूत केले.
बाद टप्प्यातील शेवटच्या 32 स्पर्धकांमध्ये पोहोचल्यानंतर वंतिकाने लॅग्नोचे आव्हान चिरडून टाकले. दुसरीकडे दिव्याचे तिच्या सामन्यात पारडे भारी राहिले आणि तिने काळ्या सोंगाट्या घेऊन खेळताना इंजॅकचा पराभव करून अपेक्षा पूर्ण केल्या. ती आता स्पर्धेत आव्हान शिल्लक राहिलेल्या पाच भारतीय खेळाडूंमधील एक प्रबळ दावेदार आहे. दरम्यान सर्वोच्च मानांकित भारतीय खेळाडू कोनेरू हम्पीची पोलंडच्या कुलोन क्लाउडियाबरोबरची लढत पांढऱ्या सोंगाट्यांसह खेळताना बरोबरीत सुटली. डी. हरिका देखील जिंकू शकली नाही आणि तिने त्सोलाकिडो स्टॅव्हरोलासमवेतचा सामना बरोबरीत सोडविला.
आणखी एक भारतीय खेळाडू आर. वैशालीचा अमेरिकेच्या कॅरिसा यिपशीबरोबरचा सामना बरोबरीत सुटला. अव्वल मानांकित चीनच्या लेई टिंगजेईने बल्गेरियाच्या आंतोनेता स्टेफानोव्हाला हरवले. बल्गेरियन आता या परिस्थितीशी कशी जुळवून घेते हे पाहावे लागले. कारण तिला टायब्रेकरमध्ये लढत पोहोचविण्यासाठी स्पर्धेतील सर्वोच्च मानांकित खेळाडूला हरवावे लागेल. आणखी एक चिनी खेळाडू झू जिनर हिने पोलंडच्या अलेक्झांड्रा माल्ट्सवेस्कायाला पराभूत करून अंतिम 16 खेळाडूंसाठीच्या शर्यतीत स्थान मिळवले.
तथापि, हा दिवस वंतिकाचा राहिला. कारण तिने या स्पर्धेत एका भक्कम दावेदार मानल्या जाणाऱ्या रशियन खेळाडूविऊद्धच्या आपल्या खेळाने सर्वांचे लक्ष वेधले. रशियन खेळाडू येथे फिडेच्या झेंड्याखाली खेळत आहे. 20 व्या चालीवर लॅग्नोने केलेल्या चुकीमुळे वंतिकाला चांगली संधी मिळाली आणि तिने कधीही मागे वळून पाहिले नाही. परतीच्या सामन्या काळ्या सेंगाट्या घेऊन खेळावे लागणार असलेल्या वंतिकाला पुढील फेरीकरिता पात्र होण्यासाठी फक्त बरोबरीची आवश्यकता आहे.