पुणे-हुबळी मार्गावर आता वंदे भारत धावणार
15 सप्टेंबरपर्यंत अधिकृत घोषणा, रेल्वेकडून वंदे भारतची तयारी सुरू
प्रतिनिधी/ बेळगाव
मागील अनेक दिवसांपासून मागणी असलेली वंदे भारत एक्स्प्रेस लवकरच बेळगावमध्ये दाखल होणार आहे. पुणे-हुबळी मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यासाठी रेल्वेने प्रयत्न सुरू केले आहेत. यामुळे बेळगावच्या नागरिकांना आता वेगवान वंदे भारत प्रवास करून महाराष्ट्राच्या विद्येच्या माहेरघराला पोहोचता येणार आहे. यामुळे बेळगावकरांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
पुणे-बेंगळूर रेल्वेमार्गावरील विद्युतीकरणाची चाचणी यशस्वीरित्या घेण्यात आली. मिरज ते कुडची या शेवटच्या टप्प्यातील विद्युतीकरण झाल्याने पुणे-बेंगळूर मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले. त्यामुळे पुणे-बेंगळूर मार्गावर विद्युत एक्स्प्रेस धावण्याचा मार्ग मोकळा झाला होता. विद्युतीकरण झाल्यामुळे सातारा, सांगली, कोल्हापूर, बेळगाव, हुबळी-धारवाड या जिल्ह्यांमधील प्रवाशांना आता वेगवान प्रवास करणे शक्य झाले आहे.
कुडची-मिरज रेल्वे मार्गाची विद्युत चाचणी 26 ऑगस्ट रोजी घेण्यात आली. पुणे-मिरज हा 280 कि. मी. चा रेल्वे मार्गावर यापूर्वीच विद्युत इंजिन धावत आहे. यामुळे एक्स्प्रेसची गती वाढली असून प्रवासाचा कालावधी कमी होत आहे. मिरज ते लोंढा या 163 कि. मी. रेल्वे मार्गाचा टप्पा पूर्ण झाल्याने आता पुणे-बेंगळूर मार्गावर विद्युत एक्स्प्रेस धावणे शक्य झाले होते. त्यामुळे वंदे भारत एक्स्प्रेस धावण्याची शक्यता वर्तविली जात होती.
बेळगाव-बेंगळूर मार्गावर वंदे भारत चाचणी घेण्यात आली. परंतु वेळेचे अडसर आल्याने हा प्रस्ताव बारगळला. यानंतर भारतीय रेल्वेने बेळगाव-पुणे मार्गावर वंदे भारत सुरू करण्याबाबत सहमती दर्शवली होती. मागील महिनाभरापासून वंदे भारत एक्स्प्रेससाठी सर्व रेल्वे स्थानकात आवश्यक बदल केले जात आहेत. या एक्स्प्रेसमुळे उत्तर कर्नाटक व पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांना वेगवान रेल्वे प्रवास करता येणार आहे.
डॉ. किरण ठाकुर यांच्या प्रयत्नांना यश
पुण्याहून बेळगावमार्गे गोवा अशी वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी काही दिवसांपूर्वीच ‘तरुण भारत’चे समूहप्रमुख व सल्लागार संपादक डॉ. किरण ठाकुर यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची दिल्ली येथे भेट घेऊन केली होती. यावेळी रेल्वेमंत्र्यांनी लवकरच वंदे भारत सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. याचबरोबर राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनीही वंदे भारतसाठी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. याचीच दखल घेत पुणे-हुबळी मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अनंत चतुर्दशीपूर्वी वंदे भारत सुरू करण्यासाठी प्रयत्न
पुणे-हुबळी मार्गावर अनंत चतुर्दशीपूर्वी वंदे भारत सुरू करण्यासाठी रेल्वेचे प्रयत्न सुरू आहेत. मध्य रेल्वे व नैर्त्रुत्य रेल्वेच्या समन्वयाने ही तयारी सुरू आहे. बेळगाव रेल्वेस्थानकातही तशा पद्धतीचे बदल केले जात आहेत. नैर्त्रुत्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने वंदे भारतच्या वृत्ताला दुजोरा दिला असून 15 सप्टेंबरपूर्वी वंदे भारतची अधिकृत घोषणा केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता बेळगाव-पुणे हा वेगवान प्रवास प्रवाशांना करता येईल.