वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच रुळावर
येत्या 3 महिन्यात सुरू होणार : रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची पाहणीअंती माहिती
वृत्तसंस्था/ बेंगळूर
रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देशवासीय लवकरच वंदे भारत स्लीपर ट्रेनमधून प्रवास करू शकणार आहेत. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रविवारी याची अधिकृत पुष्टी केली. त्यांनी बेंगळूर येथील ‘बीईएमएल’ (भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड) येथे वंदे भारत स्लीपर ट्रेन मॉडेलची पाहणी केली. यानंतर त्यांनी वंदे भारत स्लीपर ट्रेनची चाचणी दीड ते दोन महिन्यांत सुरू झाल्यानंतर येत्या तीन महिन्यात ही सुपरफास्ट रेल्वे सेवेत येणार असल्याचे स्पष्ट केले. या ट्रेनमुळे विशेषत: दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-कोलकाता या लांब मार्गांवर प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. मात्र ही गाडी कोणत्या मार्गावर धावणार हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.
वंदे भारत स्लीपर ट्रेन येत्या 3 महिन्यांत म्हणजे डिसेंबरपर्यंत सुरू होईल. कोचच्या निर्मितीचे काम पूर्ण झाले आहे. ती येत्या काही दिवसांत बीईएमएल कारखान्यातून बाहेर पडेल. त्यानंतर पुढील 2 महिने ट्रेनची चाचणी सुरू राहणार आहे. त्यानंतर ही ट्रेन प्रवाशांसाठी सुरू करण्यात येणार आहे. सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या या वंदे भारत स्लीपर ट्रेनमधील भाडेही सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल असे ठरवले जाणार आहे. ते साधारणपणे ‘राजधानी एक्स्प्रेस’च्या तिकीट दराप्रमाणे असल्याचे संकेतही रेल्वेमंत्र्यांनी दिले. सर्वसामान्यांना वंदे भारत स्लीपर रेल्वेमधून आरामात प्रवास करता येईल. वंदे भारत स्लीपर ट्रेनची पाहणी करण्यापूर्वी केंद्रीय मंत्र्यांनी बीईएमएल बेंगळूर येथे मानक आणि ब्रॉडगेज रोलिंग स्टॉक, उत्पादन सुविधेसाठी नवीन तळाची पायाभरणी केली.
वंदे भारत स्लीपर ट्रेनमधील कोचमध्ये अनेक गोष्टींची काळजी घेण्यात आली आहे. वंदे भारत स्लीपर, वंदे चेअर, वंदे मेट्रो आणि अमृत भारत या चार ट्रेन्स आपल्या देशवासियांना येणाऱ्या काळात चांगली सेवा देतील, असा अशावाद रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला आहे. प्रत्येक ट्रेनच्या स्वरुपानुसार त्यात अनेक बदल करण्यात आले आहेत. वंदे भारतमध्येही सुरक्षिततेसाठी एक नवीन यंत्रणा सुरू करण्यात आल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले.
ट्रेनमध्ये आधुनिक तंत्रज्ञान, सुरक्षितता आणि लोको पायलट आणि सेवा कर्मचाऱ्यांसाठी विशेष सुविधा उपलब्ध आहेत. या ट्रेनमध्ये अनेक सुरक्षा वैशिष्ट्योही समाविष्ट आहेत. या ट्रेनच्या मेन्टेनन्स स्टाफसाठी वेगळी केबिन बनवण्यात आली आहे. ही ट्रेन एका फेरीमध्ये 800 ते 1000 किलोमीटरचे अंतर कापेल. अर्थात जर एखादा प्रवासी रात्री ट्रेनने प्रवास करू लागला तर तो दुसऱ्या दिवशी त्याच्या गंतव्यस्थानी पोहोचेल.
जगातील सर्वोत्तम ट्रेनमध्ये गणना : रेल्वेमंत्री
वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये कपलर मेपॅनिझमचे नवीन तंत्रज्ञान आणले आहे. यामुळे ट्रेनचे वजन कमी होते आणि तिची ताकद वाढते. दोन डब्यांना जोडणारा भाग म्हणजे कपलर. हे ऑस्टेनिटिक स्टीलचे बनलेले आहे. ट्रेन तयार करताना वजनाचा समतोल आणि स्थिरता लक्षात घेण्यात आली आहे. ट्रेनचे कोच आणि टॉयलेट अपग्रेड करण्यात आले आहेत. चाक आणि ट्रॅकमधील यांत्रिक भाग खास डिझाईन करण्यात आला आहे. यामुळे ट्रेनमधील कंपन आणि आवाज कमी होईल. वंदे भारत स्लीपर ट्रेनची गणना जगातील सर्वोत्तम टेनमध्ये केली जाईल, असा दावा अश्विनी वैष्णव यांनी केला.