वंचित बहुजन आघाडी विधानसभेच्या तीनही जागा लढवणार - जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर
कुडाळ -
येत्या विधानसभा निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदार संघात वंचित बहुजन आघाडीच्यावतीने उमेदवार रिंगणात उतरविणार आहोत. तीन विधानसभेमध्ये प्रत्येकी दोन- दोन उमेदवारांच्या नावांची शिफारस पक्षाकडे पाठविण्यात आली आहे. कुडाळ - मालवण विधानसभा मतदारसंघात ओबीसी कणकवली - देवगड विधानसभा मतदार संघात मुस्लिम, तर सावंतवाडी विधानसभा मतदार संघात बौध्द उमेदवार रिंगणात असणार आहेत,अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे सिंधुदूर्ग जिल्हाध्यक्ष महेश परूळेकर यांनी पत्रकार परिषदेत शुक्रवारी येथे दिली. ओबीसी, एससी, एसटी तसेच अन्य लहान - लहान समाज एकत्र येऊन महाराष्ट्रातील सत्ता हातात घेतील,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कुडाळ येथील ओबीसी आणि आरक्षित समाज महासंघ (सिंधुदुर्ग ) जिल्हा कार्यालयात आज श्री. परूळेकर यानी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची भूमिका स्पष्ट केली. वंचित बहुजन आघाडीच्या युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सागर जाधव, कुडाळ तालुका अध्यक्ष अंकुश जाधव, शिरगाव सरपंच समीर शिरगावकर, देवगड तालुका अध्यक्ष प्रभाकर साळसकर, सुधीर अणावकर, आर.डी. कदम, भारतीय बौद्ध महासभा कुडाळ तालुकाध्यक्ष नीलेश जाधव, रामा जाधव आदि उपस्थित होते.
श्री. परूळेकर म्हणाले , सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओबीसी व मराठा असा संघर्ष कधी झाला नाही. परंतु राज्य पातळीवरचा संघर्ष लक्षात घेता मराठ्यांनी असे ठरविले की ओबीसींना मतदान करायचे नाही, तर ओबीसींनी ठरविले की मराठ्यांना मतदान करायचे नाही. म्हणून आमच्या या आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी ओबीसीसह सर्व घटकांना एकत्र घेवून भविष्यातील लढाई लढण्याची तयारी ठेवली आहे. एकिकडे महाविकास आघाडी विरूध्द महायुती अशी लढत दाखवित अन्य पक्षांकडे कुणी लक्ष देत नाही. हे वास्तव नाही,असे.
सिंधुदुर्गातील कुठल्याही आमदारांनी किंवा मंत्र्यानी येथील नैसर्गिक साधन संपत्तीचा योग्य असा उपयोग केला नाही. त्यावर आधारित कोणताही उद्योग उभा केला नाही. विकासकामे तसेच येथील लोकांच्या हितासाठी कामे केली नाहीत,अशी टीका परुळेकर यांनी करून याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी जिल्ह्यातील तिन्ही मतदार संघामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे,असे त्यांनी स्पष्ट केले.