भूगोलातून मूल्यशिक्षण
एडमंड बर्क या विचारवंताने भूगोलाचे अगदी मार्मिक वर्णन करताना म्हटले आहे, जॉग्राफी इज अॅन अर्थली सब्जेक्ट, बट अ हेवनली सायन्स’. भूगोल हा ऐहिक विषय आहे पण स्वर्गीय विज्ञान आहे. भूगोलाकडे बघण्याची, विचार करण्याची एक वेगळी दृष्टी बर्क देऊन जातात. एक विषय म्हणून भूगोल हा विषय शिकवणारे शिक्षक खूप आहेत. ते माहिती देण्याचे काम उत्तम करतात. गुगल तर गुरुजींपेक्षाही अधिक माहिती देतो. पण माहिती देण्यापेक्षा दृष्टी विकिसित करणे आणि विषयाच्या तात्विक बाबोकडे विद्यार्थ्यांचे लक्ष वेधणे हे अधिक महत्त्वाचे आणि गरजेचे आहे.
आपण राहतो ती पृथ्वीच फक्त भूगोलाच्या कक्षेत येत नाही. पृथ्वी आपल्याला केवढी मोठी वाटते. पण अवकाशात नजर टाकली तर हे भूमंडळ किती ग्रह नक्षत्र आणि ताऱ्यांनी भरलेले आहे याची नुसती कल्पना केली तर पृथ्वी किती छोटी! त्यावरचे खंड आणखी छोटे. प्रत्येक खंडातील देश त्यापेक्षा छोटे, प्रत्येक देशातील (आपण आता फक्त भारताचा विचार करू) राज्ये आणखी छोटी. या राज्यांच्या अंतर्गत येतात जिल्हे, नंतर तालुके नंतर गावं, वस्त्या. या वस्तीतलं असतं आपलं छोटं घर आणि त्या घरात राहणारा ‘मी’ हा किती छोटा क्षुद्र. विश्वाच्या पसाऱ्यासमोर तर कस्पटासमान, तरीही आपल्याला तेवढा अहंकार आणि दुराभिमान!
भूगोलाच्या अध्यापनातून हा अहंकार, दुराभिमान, गर्वहरण करण्याची विलक्षण ताकद आहे. स्वामी स्वरूपानंदांना अर्पिलेली एक मधुर भूपाळी आहे. त्यातील अगदी पहिली ओळ ‘माझे माझे लोप पावू दे, तुझे तुझे उगवू दे’. भूगोलातून विश्वाचे विशाल दर्शन होता होता ‘माझे माझे’ हा भार क्षीण होण्याची शक्यता आहे. ‘विद्या विनयेन शोभते’ मधील विनय व्यक्तिमत्वात झिरपण्याची संभावना आहे.
सर्व शक्तींचा स्रोत आहे सूर्यनारायण. किती तेजस्वी ! हे तेज आपल्यामध्ये यावे अशी आशा कोणाला नाही? सूर्याचे तेज आणि चंद्राची शीतलता दोन्ही आवश्यक. सूर्य किंवा चंद्रासारखा एकच पुत्र पुरे अशा आशयाची संस्कृत सुभाषिते खूप आहेत. शिक्षकाला सूर्य आणि चंद्रासंबंधी सांगता सांगता हळूच, अलगदपणे आपल्या मातापित्यांना आपला अभिमान वाटावा असे बनले पाहिजे हे सुचवता येते. त्यांची दृष्टी आत वळवत आपण असे खरंच आहोत का हा अंतर्मुख करणारा प्रश्न (हा प्रश्न परीक्षेसाठी, गुणांसाठी नाही) विचारता येतो.
भूगोलात अनेक नद्यांचे वर्णन आणि माहिती येते. प्रत्येक नदीची वेगळी कथा आहे. वेगळे महात्म्य आहे. सांस्कृतिक संदर्भ आहे. माहिती सोबत ही महतीही सांगायला हवी. देशात तर नदीला माता मानले आहे.
एका कवीने म्हटले आहे,
‘नदीयाँ न पिती अपना जल
वृक्ष न खाते अपना फल’
‘स्व’ च्या पलिकडे जाऊन इतरांचाही विचार करायला हवा. विश्वातील प्रत्येक घटकाकडून आपण सतत घेतच असतो. पण ‘घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत’ याचेही भान हवे. भूगोलाच्या अध्यापनातून हे भान विकसित करणे हे भूगोल शिक्षकाने विसरून चालणार नाही.
निसर्ग भरपूर देतो. लोकसंख्या कितीही वाढली तरी निसर्ग सर्वांचे भरणपोषण करू शकतो. पण कोणाची हाव पूर्ण करू शकत नाही असे म्हणतात.
निसर्गाचे क्रूर शोषण चाललंय. त्यामुळे प्रचंड हानी होतेय आणि नैसर्गिक संकटेही उद्भवतात. भूगोल हा विषय यासाठी उत्तम साधन आहे. अलीकडे ‘शाश्वत विकास’ हा शब्दप्रयोग खूप प्रचलित आहे. परमेश्वराने हे सर्व माझ्या भोगासाठीच निर्माण केलेले आहे या आत्मविनाशी विचारापासून परावृत्त व्हायला हवे.
भूगोल हा सर्व विषयांचा संयोग आहे आणि सर्व विषय भूगोलाचे भाग किंवा अंग आहेत. इतिहास, विज्ञान, अर्थशास्त्र, राजकारण असे सर्वच विषय भूगोलाशी निगडित आहेत. ज्ञानाची विभागणी, वाटणी करता येत नाही. ज्ञान अखंड आहे हा एकात्मिक विचार प्रभावी पद्धतीने मांडायला हवा. त्याचे दर्शन विद्यार्थ्यांना घडवायला हवे. प्रत्यक्ष अनुभवायला द्यायला हवे. भूगोलाच्या शिक्षकाचे कौशल्य याठिकाणी पणाला लागते.
स्वावलंबी, परावलंबी आणि परस्परावलंबी अशा तीन अवस्था आहेत. अनेकांना आपण पूर्ण स्वावलंबी, कोणावरही अवलंबून नाही असा दर्प असतो. वास्तविकपणे माणसाइतका परावलंबी अन्य कोणताच प्राणी नसेल. आपण परस्परावलंबी अधिक आहोत हे भूगोल अधिक चांगल्याप्रकारे सांगतो. या विश्वाची एकमेकांना जोडणारी साखळी आहे. कोणीही पूर्णांशाने स्वावलंबी नाही. त्यामुळे सहयोग, साहचर्य, सहकार्य, सामोपचार, सहअस्तित्व याचे सदैव स्मरण हवे. हे स्मरण करून देण्याची क्षमता भूगोल विषयात खूप आहे.
भूकंप, पूर, ज्वालामुखी, वादळ अशा नैसर्गिक आपत्तींच्या तडाख्यात देशोदेशीचे जनजीवन पार विस्कळीत होऊन जाते. अशावेळी मानवतेचे दर्शनही घडते. कानाकोपऱ्यातून मदतीचा ओघ सुरू होतो. शत्रू की मित्र राष्ट्र आहे याचाही विचार केला जात नाही. सीमा पुसट होतात. शालेय मुलेही समाजात जाऊन मदत गोळा करतात. विश्वबंधुत्वाचे दर्शन घडते. हा संस्कार, मूल्य फार मोलाचे आहे.
प्रत्येक देश आपल्या नागरिकांच्या सर्व गरजा भागवू शकत नाही. अनेक बाबतीत दुसऱ्या देशांवर अवलंबून रहावे लागते. पूर्णांशाने स्वावलंबी कोणताच देश नाही. सहअस्तित्व किती महत्त्वाचे आहे हे लक्षात आणून द्यायला हवे. आपण आपल्या देशाचे जसे नागरिक आहोत तसेच जागतिक नागरिकही आहोत. भूगोल याची जाणीव करून देतो.
खगोलशास्त्र, हवामान, भूगर्भशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र असे अनेक विषय भूगोलांतर्गत येतात. या सर्व शास्त्रांचा, विषयांचा मानवी जीवनावर प्रभाव आहे. मानवाच्या जडणघडणीत यांचा मोठा वाटा. हा विशाल पट विद्यार्थ्यांसमोर उलगडून मांडण्याचे, दाखवण्याचे काम हे गृहपाठ, परीक्षा यांच्यापलीकडचे आव्हानात्मक, सृजनात्मक असे काम आहे.
भूगोल विषयात विद्यार्थ्याला शंभर टक्के गुण जरूर मिळावेत पण पेपरमधल्या गुणांबरोबरच राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय एकात्मता, वैज्ञानिक दृष्टिकोन, पर्यावरण संरक्षण, सहकार्य हे गुण, मूल्य किंवा संस्कार जीवनात संक्रमित कसे होतील याची चिंता आणि चिंतन व्हायला पाहिजे.
विष्णूपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्श क्षमस्वमे ।
ही विनम्रता, कृतज्ञताच अधिक महत्त्वाची.
मनुष्य देवही होऊ शकतो आणि दानवही होऊ शकतो.
देव सदा देव तथा दनुज दनुज है ।
जा सकते किन्तु दोनो ओर ही मनुज है ।
मनुष्य आपल्या उदात्त कर्माने देव आणि निकृष्ट मार्गाने दानव होऊ शकतो. भूगोलाचे यथार्थ ज्ञान आणि अध्यापन त्याला देवत्वाकडे जायला मदत करू शकते. भूगोल विषयाकडे आपण असे पाहू शकतो.
- दिलीप वसंत बेतकेकर