सर्वेक्षण पुढे ढकलण्याची वक्कलिग नेत्यांची मागणी
बेंगळुरात समुदायातील नेत्यांची सभा : ‘खिश्चन’मधील जातींचा कॉलम हटविण्याची मागणी
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात सोमवारपासून प्रारंभ होणाऱ्या सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षणाला (जातनिहाय गणती) विरोध व्यक्त होत आहे. सर्वेक्षणात ख्रिश्चनांमध्ये हिंदू जाती दाखविण्यात आल्याने तीव्र विरोध होत आहे. खिश्चन धर्मासोबतच्या जातीच्या कॉलममध्ये दाखविण्यात आलेला जाती काढून टाकाव्यात, अशी मागणी जोर धरली आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत आश्वासन दिले असले तरी अद्याप अधिकृत आदेश देण्यात आलेला नाही. त्यामुळे याचे पडसाद शनिवारी वक्कलिग समुदायाच्या नेत्यांच्या सभेत उमटले. सर्वेक्षण पुढे ढकलावे, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे सोमवारपासून जातनिहाय सर्वेक्षणाला सुरुवात होईल की सर्वेक्षण लांबणीवर पडेल, याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.
सोमवारपासून जातनिहाय गणना सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर वक्कलिग समुदायात जागृती करण्यासाठी शनिवारी बेंगळुरात आदीचुंचनगिरी मठाचे निर्मलानंदनाथ स्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली सभा घेण्यात आली. सभेला वक्कलिग समुदायातील मंत्री, आमदार, खासदार व नेते उपस्थित होते. सभेत सर्वेक्षणाला तीव्र आक्षेप घेण्यात आला. सर्वेक्षण लांबणीवर टाकावे, अशी मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार रविवारी हायकमांडच्या भेटीसाठी नवी दिल्लीला जाणार असल्याचे सूत्रांकडून समजते. राज्यातील सर्वेक्षण पुढे ढकलण्याची सूचना सरकारला देण्याची विनंती ते हायकमांडकडे करणार असल्याचे समजते.
सर्वेक्षण झालेच तर धर्माच्या रकान्यान हिंदू आणि जातीच्या रकान्यात वक्कलिग अशी नोंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. पोटजातीच्या रकान्यातही वक्कलिग अशी नोंद करण्याचा सल्ला देण्यात आला. एखाद्या वेळेस सर्वेक्षणात खिश्चन वक्कलिग असा उल्लेख झाला तर रस्त्यावर उररून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आर. अशोक, सी. टी. रवी व इतर नेत्यांनी सरकारला दिला.
जातनिहाय गणना 45 दिवस पुढे ढकला : निर्मलानंदनाथ स्वामीजी
राज्य सरकारने जातनिहाय गणना 45 दिवस पुढे ढकलावी. 15 दिवस आम्ही नवरात्रौत्सवात सहभागी होणार आहे. ननवरात्रीच्या काळात सर्वेक्षण केले तर पूर्ण प्रमाणात चित्रण स्पष्ट होणार आही. अनेकजण दसरा सुटीनिमित्त परगावी जातात. त्यामुळे यापूर्वी झालेल्या सर्वेक्षणाप्रमाणे यावेळचे सर्वेक्षणही वेगळ्याच स्तरावर जाईल. त्यामुळे सर्वेक्षण 45 दिवस पुढे ढकलावे. नंतर 60 दिवसांपर्यंत सर्वेक्षण करता येईल, असा सल्ला निर्मलानंदनाथ स्वामीजी यांनी सरकारला दिला.
‘खिश्चन’अंतर्गत जातींचा कॉलम काढून टाकणार?
राज्यात केवळ जातनिहाय सर्वेक्षण होत नसून सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक सर्वेक्षण होणार आहे. लोकांच्या जातीची तसेच त्यांच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक स्थितीची माहिती जमा करून वंचितांना समान संधी देण्यासाठी हे सर्वेक्षण केले जात आहे. गदग येथे शनिवारी पत्रकारांशी ते बोलत होते. ख्रिश्चन धर्मांतर्गत विविध जातींचा उल्लेख असणारा कॉलम काढून टाकण्याबाबत मागासवर्ग आयोग निर्णय घेईल. मागासवर्ग आयोग ही संवैधानिक संस्था आहे. सर्वेक्षण करण्यासाठी आयोगाला सरकारने फक्त मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत. कोणत्याही मंत्र्याने सर्वेक्षणाला विरोध केलेला नाही. जातींचे विभाजन करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. यावरून भाजप राजकरण करत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
कट्टर राजकीय वैरी एकाच व्यासपीठावर
राजकारणात एकमेकांचे कट्टर वैरी म्हणून ओळखले जाणारे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी हे या सभेत एकाच व्यासपीठावर दिसून आले. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. निर्मलानंदनाथ स्वामीजी यांच्या एका बाजूला डी. के. शिवकुमार आणि दुसऱ्या बाजूला खुर्चीवर एच. डी. कुमारस्वामी आसनस्थ झाले होते. एकमेकांचे कट्टर राजकीय वैरी म्हणून ओळखले जाणारे हे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर एकत्र आल्याने कुतूहल निर्माण झाले. इतकेच नव्हे तर त्यांनी हस्तांदोलन करत एकमेकांची विचारपूसही केली.