शेतकऱ्यांची वज्रमुठ महायुती, महाविकासला पर्याय : स्वाभिमानीचे सचिव डॉ. महावीर अक्कोळे यांची स्पष्टोक्ती
शेतकरी संघटना एकवटल्याने पोटशुळ सुटल्याचा आरोप
कोल्हापूर प्रतिनिधी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह राज्यातील शेतकरी संघटना, गट, तट, मतभेद विसरून शेतकरी प्रश्नावर व धोरणावर एक होवू लागल्याने डाव्या विचारसरणीचा बुरखा पांघरलेल्या लोकांच्या पोटात पोटशूळ सुटले आहे. राज्यात निर्माण होत असलेली शेतकऱ्यांची वज्रमुठ ही तिसरी आघाडी नसून महायुती व महाविकास आघाडीला पर्याय असल्याची स्पष्टोक्ती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिव डॉ. महावीर अक्कोळे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात म्हटले आहे, महाविकास आघाडी सरकारने अनेक शेतकरी विरोधी निर्णय घेतले तेंव्हा भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) काय करत होता याचा खुलासा त्यांनी करावा. तिसरी आघाडी म्हणजे भाजपच्या हिताचे राजकारण म्हणणारे ज्या महाविकास आघाडीसोबत आहेत. त्या महाविकास आघाडी सरकारने सत्तेत आल्यावर अनेक शेतकरी विरोधी धोरणे राबविली तेंव्हा यांचा आवाज का बंद होता. स्वत:ला विचाराचे पाईक समजायचे आणि शेतकरी व कामगार देशोधडीला लागत असताना मुग गिळून गप्प बसायचे यापाठीमागे आपला बोलविता धनी कोण आहे हे स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडी, महायुती एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सामान्यांना त्यांच्या प्रश्नापासून विचलीत करत आहेत. आमची लढाई प्रश्नावर व धोरणावर आहे आणि याबाबत शेतकरी संघटनांनी कायमच लवचिकता दाखविली आहे. अशा परिस्थतीमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (मार्क्सवादी) उदय नारकर यांनी महाविकास आघाडीची वकीली करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करावे, असे पत्रकात म्हटले आहे.