वैशाली विजयी, प्रज्ञानंदचा पराभव
वृत्तसंस्था/ स्टॅव्हेंजर, नॉर्वे
भारतीय ग्रँडमास्टर आर. वैशालीने स्वप्नवत घोडदौड पुढे चालू ठेवताना स्वीडनच्या अनुभवी जीएम पिया क्रॅमलिंगचा पराभव केला तर तिचा भाऊ आर. प्रज्ञानंदला मात्र संघर्ष करूनही अमेरिकेच्या नाकामुराकडून पराभव स्वीकारावा लागला.
क्लासिकल टाईम कंट्रोलमध्ये दुसरा विजय मिळवित वैशालीने आपली आघाडी 2.5 गुणांची केली आहे. तिने एकूण 8.5 गुण मिळविले आहेत. चीनची महिला वर्ल्ड चॅम्पियन वेनजुन जू व युक्रेनची अॅना मुझीचुक तिच्या पाठोपाठ आहेत. मुझीचुकने भारताच्या कोनेरू हंपीचा पराभव करीत या स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला तर वेनजुनने आपल्याच देशाच्या टिंगजी लेईचा आर्मागेडॉनमध्ये पराभव केला. टिंगजी लेई 5 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.
पुरुष विभागात जागतिक अग्रमानांकित मॅग्नस कार्लसनने अमेरिकेच्या फॅबियानो कारुआनावर विजय मिळविला. या विभागातील सर्व सामने क्लासिकल टाईम कंट्रोलमध्येच निकाली झाले. फ्रान्सच्या फिरोझा अलिरेझाने विद्यमान वर्ल्ड चॅम्पियन चीनच्या डिंग लिरेनला हरविले. चौथ्या फेरीअखेर नाकामुराने 7 गुणांसह पहिले, अलिरेझा 6.5 गुणांसह दुसऱ्या, कार्लसन 6 गुणांसह तिसऱ्या, आर. प्रज्ञानंदने 5.5 गुणांसह चौथे स्थान मिळविले आहे. कारुआना 5 गुणांसह पाचव्या तर लिरेन 2.5 गुणांसह शेवटच्या स्थानावर