वैभव सूर्यवंशीचा षटकारांचा विक्रम
भारतीय युवा संघाची मालिकेत आघाडी, इंग्लंडचा 4 गड्यांनी पराभव
वृत्तसंस्था/नॉर्दम्प्टन
पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत येथे वैभव सूर्यवंशीच्या वादळी खेळाच्या जोरावर भारतीय युवा संघाने यजमान इंग्लंडवर 4 गड्यांनी विजय नोंदवित 2-1 अशी आघाडी मिळविली. 14 वर्षीय वैभवने या सामन्यात केवळ 31 चेंडूत 9 षटकार आणि 6 चौकारांसह 86 धावा झोडपल्या. 19 वर्षांखालील उभय संघामध्ये ही मालिका खेळविली जात आहे. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात पावसाचा अडथळा आल्याने पंचांनी प्रत्येकी 40 षटकांचा खेळ करण्याचा निर्णय घेतला. या तिसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंड युवा संघाने 40 षटकात 6 बाद 268 धावा जमवित भारताला विजयासाठी 274 धावांचे आव्हान दिले. त्यानंतर भारतीय युवा संघाने 34.3 षटकात 6 बाद 274 धावा झळकवित हा सामना 33 चेंडू बाकी ठेवून 4 गड्यांनी जिंकला. या मालिकेतील पहिला सामना भारताने तर दुसरा सामना इंग्लंडने जिंकून बरोबरी साधली होती.
इंग्लंडच्या डावामध्ये कर्णधार थॉमस रिवने 44 चेंडूत 3 षटकार आणि 9 चौकारांसह नाबाद 76 धावांचे योगदान दिले. सलामीच्या डॉकिन्सने 61 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारांसह 62 धावांची खेळी करताना इसाक मोहम्मद समवेत पहिल्या गड्यासाठी 13 षटकात 78 धावांची भागिदारी केली. इसाक मोहम्मदने 43 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांसह 41 धावा जमविल्या. मेयेसने 32 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 31 धावा जमविताना डॉकिन्स समवेत दुसऱ्या गड्यासाठी 53 धावांची भर घातली. फ्लिंटॉपने 2 चौकारांसह 16 धावा जमविल्या. मुर्सला खाते उघडता आले नाही. अल्बर्टने 26 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारांसह 21 धावा जमविल्या. मॉर्गन आणि रिव यांनी सहाव्या गड्यासाठी अभेद्य 60 धावांची भागिदारी केली. इंग्लंडच्या डावामध्ये 8 षटकार, 28 चौकार नोंदविले गेले. भारतातर्फे कनिष्क चौहानने 30 धावांत 3 बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड युवा संघ 40 षटकात 6 बाद 268 (डॉकिन्स 62, इसाक मोहम्मद 41, मेयेस 31, थॉमस रिव नाबाद 76, अल्बर्ट 21, फ्लिंटॉप 16, मॉर्गन नाबाद 10, अवांतर 11, चौहान 3-30, देवेंद्रन, मल्होत्रा, पुष्पक प्रत्येकी 1 बळी), भारत युवा संघ 34.3 षटकात 6 बाद 274 (वैभव सूर्यवंशी 86, मल्होत्रा 46, कुंडू 12, राहुल कुमार 27, पांगलीया 11, चौहान नाबाद 43, अंबरीश नाबाद 31, अवांतर 18, वेड 2-58, मॉर्गन, मिंटो, अल्बर्ट, ग्रीन प्रत्येकी 1 बळी)