वडगावच्या कर्जबाजारी युवकाची मंगाई तलावात आत्महत्या
बेळगाव : चावडी गल्ली, वडगाव येथील एका तरुणाने मंगाईनगर तलावात उडी टाकून आत्महत्या केली आहे. गुरुवारी ही घटना उघडकीस आली असून कर्जाला कंटाळून त्याने आपले जीवन संपविल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. खालिद सलीम तेलगी (वय 29) रा. यरगट्टी चाळ, चावडी गल्ली, वडगाव असे त्याचे नाव आहे. तो टाईल्स फिटिंगचे काम करीत होता. मंगळवार दि. 24 सप्टेंबरपासून तो बेपत्ता होता. गुरुवारी दुपारी मंगाईनगर, वडगाव येथील तलावात त्याचा मृतदेह आढळून आला. मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून येताच शहापूर पोलिसांना पाचारण करण्यात आले. मृतदेह बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनाही बोलाविण्यात आले. रमाकांत कोंडुसकर व बंडू केरवाडकर आदींनी घटनास्थळी ठाण मांडून मृतदेह बाहेर काढण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना हातभार लावला. रात्री मृतदेहाची ओळख पटविण्यात आली.
तलावाला कठडा घालण्याकडे दुर्लक्ष
मंगाईनगर रहिवासी संघ व महिला मंडळाने गेल्या दोन वर्षांपासून रस्त्याशेजारीच असलेल्या या धोकादायक तलावाला कठडा बसविण्य साठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. तरीही याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.