उद्यापासून लाळ्या प्रतिबंधक लसीकरण
घरोघरी मोहीम : जनावरांना निरोगी ठेवण्यासाठी प्रयत्न
प्रतिनिधी/ बेळगाव
राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण अभियानांतर्गत जिल्ह्यात सोमवार दि. 21 पासून लाळ्याखुरकत प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. घरोघरी जाऊन प्रत्येक जनावरांना लस टोचली जाणार आहे. पशुपालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पशुसंगोपनने केले आहे.
जिल्ह्यात 28 लाखाहून अधिक जनावरांची संख्या आहे. त्यापैकी 13 लाख 93 हजार 711 जनावरांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामध्ये बैल, म्हैस, गाय आणि त्यांच्या वासरांना लस टोचली जाणार आहे. लाळ्या खुरकत हा भयानक रोग असून, जनावरांना याची लागण झाल्यास पायाला आणि तोंडाला जखमा होतात. रोगाची तीव्रता अधिक असल्यास जनावरे अशक्त बनतात. याची दखल घेऊन पशुपालकांनी आपल्या सर्व जनावरांना लस टोचून घ्यावी, असे कळविण्यात आले आहे.
जिल्ह्यात लाळ्या खुरकत लसीकरणाचा योग्य तो पुरवठा करण्यात आला आहे. शिवाय लसीकरणासाठी जिल्ह्यात पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकही जनावर लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची काळजी खात्यामार्फत घेतली जाणार आहे.