उत्तर प्रदेश: पोटनिवडणुकांच्या पोटात दडलंय काय?
नरेंद्र मोदी हे 2014 च्या मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत वाराणसीमधून उभे राहिले. त्याकाळी ते केवळ गुजरातचे मुख्यमंत्रीच नव्हते तर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार देखील होते. वाराणसीमधून त्यांच्या लढण्याने त्यांनी भाजपचे हिंदुत्व इतके बुलंद केले की नेहमी 200च्या आतच घुटमळणाऱ्या पक्षाने पहिल्याप्रथम 543 सदस्यीय लोकसभेत बहुमत कमावले. स्वातंत्र्योत्तर भारतातील काँग्रेसची सत्तेतील मत्तेदारी केवळ मोदींनी मोडली एव्हढेच नव्हे तर त्यांनी काँग्रेस-मुक्त भारताची भाषा सुरु केली. त्याकाळी काँग्रेसने केवळ सत्ताच गमावली असे नाही तर केवळ 44 जागा मिळवून त्याचे एव्हढे जबर पानिपत झाले की आता तो शेवटचे आचके देत आहे असे भासवले गेले. पक्ष एव्हढ्या झपाट्याने मरत नसतात.
राजकारणात चढउतार चालतातच. 1984 साली इंदिरा गांधींच्या हत्येनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला केवळ दोनच जागा मिळाल्या होत्या. अटल बिहारी वाजपेयी ग्वाल्हेरमधून पराभूत झाले आणि साऱ्या पक्षाचीच वाताहत झाली. आंध्रप्रदेशच्या हनमकोंडामधून सी जंगा रे•ाr आणि गुजरातच्या आनंदमधून ए के पटेल असे दोनच उमेदवार निवडून आले. त्याअगोदर हवा वेगळी होती. या हत्येच्या दोन आठवडे अगोदर पुण्याला झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीत वाजपेयींना विरोधकांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार भासवणे सुरु झाले होते. घोषित केले गेले नव्हते. आंध्रचे मुख्यमंत्री एन टी रामाराव यांच्या पाठिंब्याने वाजपेयी यांना सिकंदराबादमधून निवडणूक लढवण्याचे घाटत होते. पुढील पंतप्रधान दक्षिणेतून असेल असे त्या भाजपच्या बैठकीत ठासून सांगितले गेले. तात्पर्य काय की बरेच मनोरथ असतात पण हवा पालटली की ते पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळतात. जहाल हिंदुत्ववाद्यांना योगी आदित्यनाथ हेच मोदींचे नैसर्गिक उत्तराधिकारी वाटत असल्याने उत्तरप्रदेशमधील या पोटनिवडणुकांच्या पोटात दडलंय काय याची उत्सुकता साहजिकच साऱ्या भाजपाईना तसेच विरोधकांना आहे. लोकसभेच्या निवडणुकीत उत्तरप्रदेशात समाजवादी पक्ष आणि काँग्रेसने मुसंडी मारली असली तरी आजच्या घडीला संघाकरिता सर्वात जवळचे मुख्यमंत्री हे योगीच होत. लोकसभा निवडणुकीनंतर गृहमंत्री अमित शहा यांच्या सुप्त आशीर्वादाने योगी विरोधकांना हवा दिली गेली पण संघाने साऱ्यांना शांत केले असे सांगितले जाते.
या पोटनिवडणुका विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीकरिता तितक्याच महत्त्वाच्या आहेत. भाजपाची उत्तर प्रदेशात नाकेबंदी केली की अर्धी लढाई जिंकल्यात जमा आहे. पुढील मुख्यमंत्री बनण्यासाठी आसुसलेले समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव या पोटनिवडणुकांत स्वत:च्याच पायावर धोंडा पाडून घेणार काय ते लवकरच
दिसणार आहे. त्यांनी ज्या प्रकारे 9 पैकी 7 जागांवर स्वत:च्या पक्षाचे उमेदवार काँग्रेसशी फारशी सल्लामसलत न करता उतरवले त्याने त्यांना नुकसान होऊ शकते. काँग्रेसने ‘आम्ही सारे एक’ असा पवित्रा वरवर ठेवला असला तरी आतमध्ये काँग्रेसी नाराज आहेत. गमतीची गोष्ट म्हणजे बदललेल्या राष्ट्रीय परिस्थितीत मुस्लिम समाज हा काँग्रेसचा कैवारी बनलेला आहे. तो प्रादेशिक पक्षांच्या दावणीला पहिल्यासारखा बांधलेला राहिलेला नाही मग तो समाजवादी पक्ष असो की लालू यादव यांचा राष्ट्रीय जनता दल. त्यामुळे हे प्रादेशिक पक्ष काँग्रेसला कोपराने खणत आहेत असा संदेश जर या समाजात गेला तर त्यांना योग्य तो धडा शिकवला जाईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात ऐकू येत आहे. भाजपने हरयाणात हॅटट्रिक केल्याने समाजवादी पक्षाचे चांगलेच फावले आहे. उत्तर प्रदेशमधील पुढील विधानसभा निवडणूक विरोधकांना जिंकायची असेल तर काँग्रेस आणि समाजवादी पक्षात 403 जागांपैकी समसमान वाटप झाले पाहिजे.
निदान 60:40 असे वाटप काँग्रेसला करून घेता आले पाहिजे. दलित व मुस्लिम समाजांनी काँग्रेसखातर समाजवादी पक्षाला लोकसभा निवडणुकीत साथ दिली होती. कोणालाही मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केले गेले नाही पाहिजे असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. निवडणूक झाल्यावर अखिलेश मुख्यमंत्री झाले तरी हरकत नाही पण निवडणुकीत उच्च वर्णियांची मते विरोधकांना पाहिजे असतील तर त्यांनी नेतृत्वाच्या प्रश्नावर सस्पेन्स ठेवणे जरुरीचे आहे असे समाजवादी पक्षातील एक असंतुष्ट गटदेखील सांगत आहे. अखिलेश यांच्या अगोदरच्या कारकिर्दीत यादव समाजाने फार उत्मात केल्याने उच्च वर्णीयांचा त्यांच्यावर रोष आहे. काँग्रेसबाबत असे काही नाही. योगी यांच्या नेतृत्वामुळे भाजपच्या सत्तेत सध्या ठाकूर समाजाचे वर्चस्व असल्याने दुसरा वजनदार असा ब्राह्मण समाज नाराज आहे.
अशातच काँग्रेसने नऊ जागांपैकी एकही जागा आपण लढणार नाही व इंडिया आघाडीला जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असे जाहीर करून एक मोठाच डाव खेळला आहे. समाजवादी पक्षाने ज्यापद्धतीने काँग्रेसला न विचारता सात जागांवर आपले उमेदवार उतरवले व दोन अवघड जागा काँग्रेस करता सोडण्याचे आपण औदार्य दाखवत आहोत असेच जाहीर केलेले होते. अखिलेश यादव यांना सरळ करण्यासाठी हा डाव खेळण्यात आलेला आहे. एकप्रकारे ही काँग्रेसकरता इष्टापत्तीच ठरली. काँग्रेसकडे म्हणावे तसे उमेदवारच नाहीत व पुढील दोन वर्षात जर पक्ष ठीकपणे बांधला गेला नाही तर भाजप परत तिसऱ्यांदा सत्तेत येऊ शकते.
या पोटनिवडणुकांत भाजपला फटका जरी बसला तरी योगी यांचे संघाच्या दरबारात अजिबात वजन कमी होणार नाही अशी निक्षून चर्चा राजकीय वर्तुळात ऐकायला मिळते. याला कारण की लोकसभा निवडणुकीतील मोदींच्या फिक्या कामगिरीनंतर ‘पुढे कोण?’ या प्रश्नावर नागपूरमध्ये खल सुरु झालेला आहे आणि त्याकामी योगी हा त्यांच्या गळ्यातील ताईत दिसत आहे. ‘बटेंगे तो कटेंगे’ अशा वादग्रस्त घोषणांनी हिंदुत्वाचा जागर योगींनी चालवला असल्याने कोणाला त्यांची वक्तव्य कितीही प्रक्षोभक वाटोत हिंदुत्वाचा पोस्टर बॉय अशी त्यांची प्रतिमा ती घट्ट करत आहेत. बहराईच येथे झालेल्या जातीय दंग्याने भाजपचे जहाल हिंदुत्वाचे कार्ड परत मजबूत करण्यात मदत केलेली आहे असे मानले जात आहे. जोपर्यंत लोकांच्या
भावना पेटवता येत नाहीत तोवर भाजपला निवडणूक जिंकणे कठीण जाते असा अनुभव विशेषत: उत्तर प्रदेशाचा राहिलेला आहे. या पोटनिवडणुकात बसपाच्या मायावतीदेखील काय राजकारण करतील ते बघणे मजेशीर ठरेल. मोदी पंतप्रधान झाल्यापासून भाजपला सर्वप्रकारे आडून मदत मायावती यांनी केलेली आहे. या नऊ जागांपैकी 4 समाजवादी पक्ष, 3 भाजप आणि प्रत्येकी एक रालोद आणि निषाद पक्षाने गेल्या निवडणुकीत जिंकल्या होत्या. गेल्या विधानसभा निवडणुकीत बसपाला अखंड उत्तरप्रदेशात केवळ एकच जागा मिळाली होती. लोकसभा निवडणुकीत तर बसपाचे खातेच खोलले गेले नव्हते.
उत्तरप्रदेशात भाजप जोरदारपणे जिंकली तरच ती देशावर हुकूमत गाजवू शकते याची जाणीव राजकीय वर्तुळात असल्याने या पोटनिवडुणकांच्या पोटात दडलेय काय ते बघणे महत्त्वाचे ठरत आहे. बुलडोझर बाबा बनून योगींनी हिंदुत्वाची मतपेढी घट्ट करण्याचे राजकारण किती काळपर्यंत यशस्वी राहणार आणि दररोज लोकांना सतावणारे प्रश्न कधी जोमात पुढे येणार यावर उत्तरप्रदेश काय वळण घेणार ते अवलंबून आहे. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊन आता आम्ही भाजपचा पाडाव केला असा होरा विरोधकांचा असेल तर तो घातक ठरेल. मोदी असोत की योगी असोत ते निवडणूक झालेल्या दिवसापासून परत कामाला लागतात अशावेळी वाराणसीमध्ये सहा फेऱ्यात आह्मी पंतप्रधानांना मागे ठेवले होते असे बोलून समाधान मानणे म्हणजे विरोधकांनी स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे असा होईल. गेल्या विधानसभा निवडणुकीत प्रियांका गांधी यांनी झंझावाती प्रचार करूनदेखील पक्षाला अवघ्या दोनच जागा मिळाल्या होत्या हे विसरून चालणार नाही. उत्तर प्रदेश हा ‘उलटा प्रदेश’ आहे हे लोकसभा निवडणुकीने दाखवून दिलेले आहे.