Vari Pandharichi 2025: पंढरपूरची वारी अन् यजमानकृत्य, काय आहे यामागील गोष्ट
अनेक भाविक वारीला बडवे, उत्पात मंडळीच्या वाड्यात राहत
By : चैतन्य उत्पात
पंढरपूर : बदलत्या काळानुसार आज पंढरीच्या वारीचे स्वरूप बदलले आहे, मात्र काही वर्षापूर्वी वारी हेच पंढरपूरच्या लोकांचे जगण्याचे साधन होते, पूर्वी तर चार वाऱ्यावर जगणारे गाव अशीच पंढरपूरची ओळख होती. विशेषत: मंदिर परिसरातील पुजारी लोक आणि इतर मंडळीचे जगण्याचे साधन म्हणजे यजमान कृत्य हेच होते.
त्याकाळी मंदिर परिसरातील हजारो घरात वारीसाठी आलेले भाविक राहत असत. या भाविकांची सेवा करून अर्थप्राप्ती करणे म्हणजे यजमानकृत्य, तेव्हा पंढरपूरचे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजेचे हक्क बडवे, उत्पात, सेवाधारी मंडळी यांना होते. अनेक भाविक वारीला बडवे उत्पात मंडळीच्या वाड्यात राहत.
नवमी ते पौर्णिमा किंवा थेट गोपाळकाला, महाद्वार कालापर्यंत या भाविकांचे वास्तव्य असे, यात आजही पिढ्यानपिढ्या येणारे भाविक त्याच ठराविक वाड्यात किंवा घरात राहतात. गावाकडून येताना शिधा आणलेला असतो. द्वादशी दिवशी घराघरात श्रीखंड पुरी, बासुंदी, जिलेबी असे मिष्टान्नाचे भोजन असते, तेव्हा घरमालकाने कुटुंबासह वारकऱ्यांसोबत भोजनाची परंपरा आहे.
गावाकडे परत जाताना उरलेला शिधा, सामान, भाजीपालाही मालकाला देऊन जातात. घरी काही न्यायचे नाही हा दंडक असल्याप्रमाणे सर्व देऊन ते जातात. वारीच्या परंपरेप्रमाणे यजमानकृत्याची ही परंपरा स्नेहभाव जपणारी आहे.