संवादिनी विषयात एमए करणारी पहिली गोमंतकन्या उत्कर्षा
उत्कर्षाने जादुई बोटांनी साधला यशस्वी पल्ला : आता संवादिनी विषयात पीएचडी करण्याचे ध्येय
रविराज च्यारी/ डिचोली
संगीत कलेतून भविष्य घडविण्याचे स्वप्न पाहत असतानाच अनेकांकडून या कलेत कशाप्रकारे भविष्य घडणार? अशी विचारणा माझ्या आई-वडिलांना करण्यात येत होती. परंतु माझे गुऊ व आई-वडील यांच्या मजबूत पाठिंब्यामुळे आणि या कलेत उच्च स्थानी जाण्याची माझी जिद्द, चिकाटी यामुळे संगीत कलेत संवादिनी या विषयात मी एमए पर्यंतचा पल्ला गाठलेला आहे... हे शब्द आहेत संवादिनी विषयात एमए झालेल्या पहिल्या गोमंतकीय कन्या सडेती चोडण येथील उत्कर्षा जयवंत फोंडेकर हिचे.
संगीत क्षेत्रात गोव्यामध्ये संगीत, गायन, तबला या विषयात, तसेच हार्मोनियम या विषयात अनेक पुरूष कलाकारांनी एमए केलेले आहे. परंतु गोव्यातील एका युवतीने प्रथमच हार्मोनियम कलेत एमए केले असून या क्षेत्रात भविष्य घडवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अनेक युवतींसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
उत्कर्षाने आपल्या 24 वर्षांच्या आयुष्यातील 17 वर्षे संवादिनी वादनाच्या कलेसाठी अक्षरश: अर्पण केली आहेत. या कठोर तपश्चर्येनंतर तिने एमए पर्यंतचे शिक्षण गाठले असून आता संवादिनी या विषयावरच पीएचडी करण्याचे ध्येय तिने बाळगले आहे. एक उत्तम उदाहरण संपूर्ण गोव्यासमोर तिने निर्माण केले आहे. या यशाचे श्रेय उत्कर्षा आपले आई-वडील यांना देतेच, पण कला अकादमीचे संगीत शिक्षक प्रा. सुभाष फातर्फेकर हेच तिचे रोल मॉडेल आहेत, असे तिने सांगितले.
घरातूनच संगीताचे संस्कार
उत्कर्षा जयवंत फोंडेकर हिला संगीताची आवड घरातूनच आपले बाबा जयवंत फोंडेकर यांच्या प्रेरणेतून निर्माण झाली. घराची पार्श्वभूमी तशी कलाकारांचीच. बाबा जयवंत हे भजनी कलाकार, त्यामुळे उत्कर्षालाही या संगीतकलेची आवड. तिचे प्राथमिक शिक्षण डिचोलीतील शांतादुर्गा शिशुवाटिकेत झाले, पहिली दुसरीचे शिक्षणही शांतादुर्गा प्राथमिक शाळेत झाले. त्यानंतर तिसरी ते दहावीपर्यंतचे शिक्षण चोडण येथील दयानंद हायस्कूलमध्ये झाले. तिसरीत असताना दयानंद हायस्कूलचे संगीत शिक्षक किशोर आगरवाडेकर यांच्याकडे संगीताचे धडे घेतले तर संवादिनीसाठी विशेष वर्गातून शिक्षण प्राप्त केले.
आगरवाडेकर यांचे मार्गदर्शन
तिला संगीताची आवड असल्याने वडील जयवंत यांनी तिला डिचोलीयेथील गुऊवर्य स्व. जगन्नाथ पेठकर गुऊजी यांच्याकडे गायनाचे धडे घेण्यासाठी भरती केले होते. त्यांच्याकडे गायनाचे धडे घेत असतानाच 2008 मध्ये त्यांची प्रकृती बरी नसल्याने या शिक्षणात खंड पडला. पाचवीत पोचल्यावर संगीत या विषयात उत्कर्षाने हार्मोनियम हाच विषय निवडला. त्यावर्षी ती दहा वर्षांची होती. त्यानंतर आगरवडेकर यांनी तिला कला व संस्कृती खात्यातर्फे घेण्यात येणाऱ्या गोवा टॅलेंट सर्च या स्पर्धेत सहभागी होण्याचा सल्ला दिला. या स्पर्धेत उत्कर्षा हिने 2015 साली तालुका पातळीवर पहिले बक्षीस मिळवले. त्याच वर्षी राज्यपातळीवरही पहिलेच बक्षीस प्राप्त केले.
कला अकादमीत दाखल
2014 मध्ये पं. मनोहरबुवा शिरगावकर विभागीय भजनी स्पर्धेत तिला उत्कृष्ट संवादिनीवादक हे बक्षीस प्राप्त झाले. शिक्षक किशोर आगरवाडेकर यांनीच तिला कला अकादमीत हार्मोनियमचे विशेष शिक्षण घेण्याचा सल्ला दिला. या सल्ल्याला मान देऊन 2018 मध्ये तिने कला अकादमीत संवादिनी शिक्षणासाठी प्रवेश केला. येथे फाउंडेशन 3 हार्मोनियम या विषयात प्रवेश मिळवत अभ्यासक्रमांमध्ये प्राविण्य प्राप्त केले. सध्या तिचे पारंगत एक शिक्षण सुरू असून आज ती तेथील वरिष्ठ विद्यार्थी आहे,. हे तिचे आठवे वर्ष आहे.
उत्कर्षा हिने अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मुंबई केंद्र यामध्ये 2013 पासून संगीत शिक्षणास प्रारंभ करून 2022 प्रारंभिक पूर्ण केले, तर 2022 मध्ये विशारद झाले. अलंकार प्रथम हा पल्ला तिने गाठला असून सध्या अलंकार पूर्ण अभ्यास सुरू आहे. या संगीत शिक्षणात पदवी मिळवल्यानंतर तिने संवादिनी या विषयातच एमए करण्याचे ध्येय बाळगले. व त्यासाठी युजीसी मान्यता प्राप्त राष्ट्रीय दर्जाच्या सोलापूर महाराष्ट्र येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथे प्रवेश मिळवला. या विद्यापीठात 2023 ते 2025 या कलावतीत एमएचा अभ्यासक्रम पूर्ण करून गेल्या मे महिन्यातच तिला एमए पदवी प्राप्त झाली आहे. या विद्यापीठात एमएममध्ये विशेष श्रेणीत उत्तीर्ण होत संगीत विभागात विद्यापीठात दुसरा क्रमांक उत्कर्षा हिने पटकावला आहे.
महाराष्ट्र, गुजरातमध्येही प्रशंसा
या विद्यापीठात शिक्षण घेत असतानाच महाराष्ट्र राज्य पातळीवरील युवा महोत्सवात हार्मोनियम एकलवदन सादर करण्याची संधी तिला लाभली. तेथे पात्र ठरल्यानंतर गुजरात येथेही पश्चिम विभागासाठी तिची निवड झाली व तेथेही तिने दिग्गज कलाकारांसमोर हार्मोनियम एकलवदन सादर केले. व सर्वांकडून वाहवाही मिळवली. या संपूर्ण शिक्षणात सोलापूर येथे विद्यापीठातील प्राध्यापक चंद्रशेखर तेलंगे यांचेही त्यांना बहुमूल्य मार्गदर्शन व पाठिंबाही मिळाला.
संगीताबरोबरच शिक्षणातही आघाडी
संगीत शिक्षणाबरोबरच अकरावी बारावीचे शिक्षण तिने कुजिरा येथे के. ब. हेडगेवार उच्च माध्यमिक विद्यालयात घेतले. त्यानंतर उत्कर्षा हिने अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होऊन बक्षीसे मिळवली. बारावीत ‘मोस्ट रिस्पॉंडिंग गर्ल’ हा पुरस्कारही तिला मिळाला होता. तिने धेंपे महाविद्यालयात मानसशास्त्र विभागामध्ये पदवी घेतली आहे. सध्या उत्कर्षा पणजी येथे संजिवन म्युझिक अकादमी या प्रसिध्द कलाकार प्रवीण गावकर यांच्या अकादमीत विद्यादान करत आहे.
उत्कर्ष हिच्या या 17 वर्षाच्या अलंकारिक प्रवासात तिला तिचे वडील जयवंत भिकू फोंडेकर, आई शैलजा जयवंत फोंडेकर, लहान बहीण वैष्णवी व लहान भाऊ प्रथमेश यांची मोलाची साथ लाभली. या संपूर्ण शिक्षणासाठी आलेल्या खर्चाबाबत तिचे वडील जयवंत यांनी तिला कधीही जाणीव होऊ दिली नाही. आतापर्यंतच्या यशस्वी वाटचालीत तिला तिचे गुऊ प्रा. सुभाष फातर्फेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. त्याच प्रमाणे पर्वरी येथील गुऊबंधू चाऊदत्त गावस यांनीही वेळोवेळी मोलाचे सहकार्य केले. विशारद पूर्ण परीक्षेसाठी रोहन गोवेकर यांनी स्वत:हून मदत केल्याने अनेक अडथळे दूर झाले, असे ती मोठ्या अभिमानाने सांगते.
उत्कर्षा हिचे वडील जयवंत फोंडेकर यांनी सांगितले की, आपणास संगीताची मोठी आवड होती व आहे. आपल्या मुलांनीही या क्षेत्रात काहीतरी करून दाखवावे यासाठी त्यांना आपण सदैव पाठबळ दिले. या वाटचालीत अनेकांनी आपणास साथ दिली. आपली मुले कोणत्यातरी ध्येयाने पुढे जात असेल तर त्यांचे ध्येय हे आपले ध्येय मानून आपण समर्पित भावनेने सर्व ते सहकार्य यांना दिले. आपली लहान मुलगी वैष्णवी ही आज शिरगाव येथे अऊण गावकर यांच्याकडे गायनाचे धडे घेते. तर लहान मुलगा प्रथमेश हा गोवा संगीत महाविद्यालयात तबला वादन शिकतो. त्यांनाही या क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेण्यासाठी आपण व पत्नी आवश्यक ते सहकार्य करण्यास तयार आहे, असे सांगितले.