For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सिंधुदुर्गातील बांधकाम कामगारांना भांडी व सुरक्षा संच वितरित करणार

04:30 PM Jul 05, 2024 IST | अनुजा कुडतरकर
सिंधुदुर्गातील बांधकाम कामगारांना भांडी व सुरक्षा संच वितरित करणार
Advertisement

बांधकाम कामगार महासंघाचे जिल्हा अध्यक्ष भगवान साटम यांची माहिती 

Advertisement

मालवण । प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नोंदीत बांधकाम कामगारांना गृहपयोगी भांडी संच व सुरक्षा संच वाटप एकाच वेळी तालुका स्तरावर केले जाणार आहे. भांडी संच व सुरक्षा संच वाटप नियोजन बैठक सहाय्यक कामगार आयुक्त रत्नागिरी यांच्या सोबत बांधकाम कामगार महासंघ सिंधुदुर्ग जिल्हा पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आज रोजी रत्नागिरी येथे संपन्न होऊन भांडीसंच व सुरक्षा संच वाटप नियोजन कार्यक्रम निश्चित करण्यात आल्याची माहिती बांधकाम कामगार महासंघाचे जिल्हा अध्यक्ष भगवान साटम यांनी दिली.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिवित नोंदणी असलेल्या ५१७० एवढ्या बांधकाम कामगारांना लोकसभा निवडणुकी पूर्वी गृहपयोगी 30 भांड्यांचा संच बांधकाम कामगार महासंघाच्या मागणी नुसार व पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार कामगारांच्या सोयीच्या दृष्टीने तालुका स्तरावर वाटप करण्यात आले होते. मध्यंतरीच्या काळात आदर्श आचारसंहितेच्या कारणास्तव भांडी वाटप बंद करण्यात आले होते. या बाबत बांधकाम कामगार महासंघ प्रदेश अध्यक्ष हरी चव्हाण यांनी सहाय्यक कामगार आयुक्त तथा सरकारी कामगार अधिकारी संदेश आयरे यांच्याशी संपर्क साधून कामगारांना केले जाणारे भांडी संच वाटप जिल्हा स्तरावर न करता कामगारांच्या सोयीच्या दृष्टीने तालुका स्तरावरच करण्याची विनंती केली होती.या अनुषंगाने आज दिनांक ५ जुलै रोजी सहाय्यक कामगार आयुक्त संदेश आयरे, दुकाने निरक्षक आर.बी. हुंबे तसेच भांडी संच वाटप ठेकेदार कंपनी व्यवस्थापक श्री सॅम व श्री.लवेकर तसेच बांधकाम कामगार महासंघ प्रदेश अध्यक्ष हरी चव्हाण, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष.भगवान साटम, जिल्हा सचिव हेमंतकुमार परब,तालुका प्रतिनिधी राजेंद्र आरेकर या पदाधिकाऱ्यांसोबत एकत्रित रत्नागिरी येथे बैठक होऊन महासंघाच्या मागणी नुसार तालुका वार भांडी संच वाटप कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे.
या नुसार मालवण तालुक्यातील जीवित नोंदणी असलेल्या सुमारे २ हजार एवढ्या बांधकाम कामगारांना मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे तर देवगड तालुक्यातील सुमारे २ हजार कामगारांना खरेदी विक्री संघ सभागृह येथे दिनांक ९ जुलै २०२४ ते १४ जुलै २०२४ या कालावधीत भांडी संच वाटप तसेच ज्या कामगारांना सुरक्षा संच मिळालेला नाही त्या कामगारांना सुरक्षा संच वाटप केले जाणार आहे. तसेच कणकवली तालुका १६ ते २१ जुलै नगरपंचायत हॉल, सावंतवाडी येथे १६ ते १८ जुलै नगरपरिषद हॉल येथे, वेंगुर्ला १९ व २० जुलै साई मंगल कार्यालय येथे, कुडाळ २३ ते २८ जुलै पंचायत समिती हॉल येथे तसेच वैभववाडी, दोडामार्ग २१ जुलै रोजी बांधकाम कामगारांना भांडी वाटप संच व सुरक्षा संच वाटप करण्यात येणार असल्याचे नियोजन बैठकीमध्ये निश्चित करण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे १२ हजार बांधकाम कामगारांना भांडी संच लाभ मिळणार आहे.तसेच ज्या कामगारांना सुरक्षा संच मिळालेला नाही त्यांना तोही संच मिळणार आहे. सदर दोन्ही वस्तू रुपी लाभ पूर्णतः मोफत असून, कामगारांनी या साठी कोणासही पैसे न देण्याचे आवाहन संदेश आयरे यांनी करून या वाटप कॅम्प चा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांधकाम कामगारांनी आपल्या तालुक्याच्या ठिकाणी उपस्थित राहून लाभ घ्यावा. असे आवाहन केले आहे.ज्या कामगारांनी अद्याप पर्यंत आपल्या नोंदणीचे नूतनीकरण केलेले नाही त्यांनी ते लवकरात लवकर भारतीय मजदूर संघ कार्यालय येथे करून घेण्याचे आवाहन साटम यांनी केले. सहाय्यक कामगार आयुक्त यांनी बैठक आयोजित करून संच वाटप तारखा नियोजन निश्चित केल्या बद्दल श्री साटम यांनी समाधान व्यक्त केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.