‘उटा’ संघटना कोणत्या पक्षाच्या दावणीला बांधलेली नाही : वेळीप
मंत्री गोविंद गावडेंच्या समर्थनार्थ ‘उटा’ फर्मागुडीत एकवटले
फोंडा : युनायटेड ट्रायबल असोसिएशन अलायन्स (उटा) ही संघटना कोणत्याही एका विशिष्ट पक्षाच्या दावणीला बांधलेली संघटना नाही. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना मंत्री गावडे यांच्या मंत्रीपदाबद्दल निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. ठराविक लोकांची बाजू ऐकून निर्णय न घेता समस्त 15 लाख गोमंतकीय जनतेसह संपूर्ण बहुजन समाजाचा विचार करून मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा. ‘उटा’ च्या प्रलंबित मागण्यांसाठी संघर्ष सुरूच राहणार आहे, असा इशारा उटाचे अध्यक्ष प्रकाश शंकर वेळीप यांनी दिला. फर्मागुडी येथील श्री गोपाळ गणपती सभागृहात काल शुक्रवारी सायंकाळी झालेल्या उटाच्या बैठकीत हजारोंच्या संख्येने मंत्री गोविंद गावडे यांच्या समर्थनार्थ समाजबांधव व हितचिंतक हजर होते. गोविंद गावडे तुम आगे बढो.. हम तुम्हारे साथ है! अशा घोषणांनी सभागृह दणाणून सोडले होते. यावेळी सांगेचे माजी आमदार तथा गोवा अनुसूचित जमाती वित्त विकास महामंडळाचे अध्यक्ष वासुदेव गावकर, उटाचे कार्यकारी अध्यक्ष विश्वास गावडे, सरचिटणीस दुर्गादास गावडे, डॉ. उदय गावकर, सूर्यकांत गावडे, मोलू वेळीप, सतीश वेळीप, मालू वेळीप व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
... तर चक्रीवादळ अटळ : विश्वास गावडे
मंत्री गोविंद गावडे हे आज फक्त आदिवासी समाजाचे नेते नसून राज्यातील बहुजन समाजाचाही पाठिंबा असलेले नेते आहेत. त्यांचा हा चढता क्रम काही लोकांना खुपतोय, त्यासाठीच त्यांना शिस्तबद्धरित्या संपविण्यासाठी षडयंत्र काही राजकीय पुढाऱ्यांकडून सुरू असल्याचा आरोप उटाचे कार्यकारी अध्यक्ष विश्वास गावडे यांनी केला. 25 मे 2011 रोजीच्या उटा संघटनेचे जनआंदोलनाचे सर्व लाभ भारतीय जनता पक्षाला झालेले आहेत. माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रिकर यांना प्रथम समर्थन देणारे अपक्ष आमदार गोविंद गावडे होते. अपक्ष असूनही शिरोडा मतदारसंघातील भाजपा उमेदवाराच्या विजयासाठी त्यांनी जिवाचे रान केले. सन 2022 साली डॉ. प्रमोद सावंत यांना मुख्यमंत्रीपदापर्यंत पोचविण्यासाठी मंत्री गोविंद गावडे यांचा सिंहाचा वाटा आहे. पदोपदी भाजप सरकारच्या मदतीला धावणाऱ्या गोविंद गावडेंवर कारवाईचा बडगा उगारण्याच्या मागणीला मुख्यमंत्र्यांनी योग्य न्याय द्यावा. अन्याय झाल्यास उटा व आदिवासी संघटना गप्प बसणार नाही, वादळ होईल, राज्यातील समाजबांधव पेटून उठून चक्रीवादळाचे स्वरूप प्राप्त होईल, असा इशारा उटाचे कार्यकारी अध्यक्ष विश्वास गावडे यांनी दिला.
म्हणून मंत्री गावडेंना राग येतो
मंत्री गोविंद गावडे यांना राग का येतो याची सविस्तर स्पष्टीकरण देताना उटाचे सरचिटणीस दुर्गादास गावडे म्हणाले की, मंत्री गोविंद गावडे आपल्या एसटी समाजबांधवांच्या हितासाठी सरकारात राहून पोटतिडकीने बोलतात म्हणून त्यांना हे सहन करावे लागत आहे. आज प्रत्येक फाईल पुढे सरकण्यासाठी आपण स्वत: पाठपुरावा करत असल्याचा दुजोरा आपल्या फाईलचा गट्टा समाजबांधवांना उंचावून दाखवित केला. आदिवासी कल्याण खात्याकडून फाईल पुढे सरकत नसल्यामुळे मंत्री गोविंद गावडेंना राग येतो. सदैव समाजहितासाठी झटणाऱ्या मंत्री गावडे यांच्या पाठिशी उटा संघटना आणि आदिवासी समाज बांधव पूर्ण ताकदीनिशी असल्याचा विश्वास दुर्गादास गावडे यांनी व्यक्त केला.
ते 2011 सालात कुठे होते?
युगांक नाईक म्हणाले की, आदिवासी समाजाच्या उटाच्या प्रेरणा दिवशी मंत्री गोविंद गावडे यांनी काय बोलावे हे इतरांनी त्यांना शिकवू नये. सन 25 मे 2011 रोजी ज्या दिवशी या संघटनेच्या दोन शिलेदारांना आगीत जाळून ठार मारले. हा गुन्हा आहे, तो तुम्ही लपवू नका, त्याची पारदर्शक चौकशी करा! त्यावेळी मानवी हक्क आयोग कुठे होता? असा सवाल उपस्थित केला. उटाच्या व्यासपीठावरून बोललेल्या वक्तव्याचे स्पष्टीकरण उटा संघटनेने कोणालाही कदापी देऊ नये. याप्रकरणी मंत्री गावडे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई कशी होऊ शकते हाच प्रथम संशोधनाचा विषय आहे.
राजकीय आरक्षणासाठी संघर्ष अटळ
डॉ. उदय गावकर यांनी समाजबांधवांना संबोधित करताना म्हणाले की, आदिवासी समाजाने गाफिल राहू नये, आमच्या प्रलंबित मागण्यासाठी आंदोलनाशिवाय पर्याय नाही. सरकार सहज काहीच देणार नाही, येत्या 2027 साली एसटीसाठी राजकीय आरक्षण कदापी शक्य नाही. आपल्या प्रलंबित मागण्यासाठी सदैव लढा देण्यासाठी सज्ज राहा असे आवाहन केले. स्वागत दुर्गादास गावडे यांनी केले. प्रास्ताविक डॉ. उदय गावकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल गावकर यांनी केले. दया पागी यांनी आभार मानले.