शोध मोहिमेसाठी अत्याधुनिक ड्रोनचा वापर
अंकोला तालुक्यातील शिरुर दुर्घटनेतील बेपत्तासह ट्रकचा शोध घेण्याची मोहीम सुरूच
कारवार : अंकोला तालुक्यातील शिरुर दुर्घटनेतील बेपत्ता झालेल्या व्यक्तींचा आणि ट्रकचा शोध घेण्याची मोहीम गंगावळी ऑपरेशन गुरुवारी दहाव्या दिवशीही सुरूच आहे. दहा दिवसांच्या मोहिमेनंतरही अद्याप अपेक्षित यश न मिळाल्याने शोध मोहीम शुक्रवारी (दि. 26) सुरूच ठेवण्याची माहिती कारवार-अंकोलाचे आमदार सतीश सैल आणि कारवार जिल्हाधिकारी लक्ष्मीप्रिया यांनी दिली. कर्नाटकच्या इतिहासातील अलीकडच्या काळातील ही मोहीम मोठी आणि प्रदीर्घ कालावधीची मानली जात आहे. तीन-चार दिवसांपूर्वी गंगावळी नदीत अज्ञात पुरुषाचा अर्धा मृतदेह सापडला होता. दरम्यान तामिळनाडूतील एका दांपत्याने तो मृतदेह आपल्या मुलग्याचा आहे, असा दावा केला होता. त्याकरिता जिल्हा प्रशासनाने त्या अर्ध्या मृतदेहाचे आणि दावा केलेल्या त्या दाम्पत्याचे डीएनए सँपल्स परीक्षणासाठी पाठविले होते. परीक्षणाचे रिपोर्ट गुरुवारी जिल्हा प्रशासनाच्या हाती आले असून तो अज्ञात मृतदेह दावा केलेल्या त्या दाम्पत्याच्या मुलाचाच असल्याचे स्पष्ट झाले आहे. तो मृतदेह शरवण नावाच्या लॉरी चालकाचा असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे शिरुर येथे राष्ट्रीय हमरस्ता क्र. 66 वर दरड कोसळून मृत झालेल्यांची संख्या आता नऊ झाली आहे.
या दुर्घटनेनंतर अद्याप बेपत्ता असलेल्या त्या तीन व्यक्तींचा केरळमधील लॉरीचालक अर्जुन, लोकेश नाईक, जगन्नाळ नाईक आणि ट्रकचा शोध घेण्याची माहीम सुरूच आहे. राष्ट्रीय हमरस्त्यावरील दरड हटविण्याचे कार्य बहुतेक पूर्णत्वाला गेले आहे. तरीसुद्धा या रस्त्यावरील वाहतुकीला अद्याप हिरवा कंदील दिलेला नाही. जिऑलॉजीकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या अहवालानंतरच या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होणार आहे. शोध मोहिमेत गुंतलेल्या भारतीय लष्कर, भारतीय नौसेना, भारतीय तटरक्षक, एनडीआरएफ, एसडीआरएफ, अग्निशमन दल, किनारपट्टी पोलीस दल, पोलीस खाते आदी एजन्सीनी आता केवळ गंगावळी नदीवर लक्ष केंद्रित केले आहे. दिल्ली येथील निवृत्त मेजर जनरल इंद्र बलन यांच्या नेतृत्वाखाली अत्याधुनिक ड्रोनद्वारे शोध मोहीम हाती घेतली आहे. या ड्रोनद्वारे आकाशात 2.4 कि.मी. उंचीवरील 20 मी. मातीत आणि 70 मी. खोल पाण्यातील वस्तूंचा वेध घेता येतो. ड्रोनद्वारे शोध घेताना गंगावळीत चार वस्तूंचा शोध लागल्याचे सांगण्यात आले. यापैकी एक वस्तू इलेक्ट्रीकल टॉवर, दुसरी वस्तू रीलिंग, तिसरी वस्तू टँकरचे केबीन आणि चौथी वस्तू बेपत्ता झालेली ट्रक असावी, अशी शक्यता वर्तविली जात आहे. शिरुर परिसरात कोसळणाऱ्या पावसामुळे आणि गंगावळी नदीतील वेगवान प्रवाहामुळे ट्रेस झालेल्या वस्तूंपर्यंत पोहोचणे कठीण झाले आहे. ट्रेस झालेल्या वस्तूंपर्यंत पोहोचणे भारतीय नौसेनेच्या पणबुड्यांना धोकादायक बनून राहिले आहे. दरम्यान, ही शोधमोहीम शुक्रवारी अकराव्या दिवशीही सुरूच राहणार आहे.
नऊ तालुक्यांतील शाळांना आज सुटी
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आज शुक्रवार दि. 26 रोजी जिल्ह्यातील नऊ तालुक्यांतील शाळा, पदवीपूर्व महाविद्यालयांना सुटी देण्यात आल्याची माहिती कारवार जिल्हाधिकारी लक्ष्मी प्रिया यांनी दिली. सुटी दिलेल्या तालुक्यामध्ये कारवार, अंकोला, कुमठा, होण्णावर, भटकळ, दांडेली, सुपा, हल्याळ आणि यल्लापूर या नऊ तालुक्यांचा समावेश आहे.