जीवाश्म इंधनाचा वापर बंद व्हावा
संयुक्त राष्ट्रसंघ महासचिवांचे आवाहन : कोळशाचा वापर सुरूच राहणार असल्याची भारताची भूमिका
वृत्तसंस्था/ दुबई
दुबईत 12 डिसेंबरपर्यंत चालणारी सीओपी28 परिषद सुरू झाली आहे. जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी कोळसा आणि अन्य जीवाश्म इंधनावरील (फॉलिस फ्यूल) निर्भरता कमी करावी लागेल आणि हळूहळू याचा वापर पूर्णपणे बंद करावा लागणार आहे. जीवाश्म इंधनामुळे मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन होत आहे. याचमुळे जागतिक तापमान सातत्याने वाढत असल्याचे उद्गार संयुक्त राष्ट्रसंघ महासचिव अँटोनियो गुतेरेस यांनी काढले आहेत.
आगामी काही वर्षांकरिता कोळसा हा भारताच्या ऊर्जेचा मुख्य स्रोत म्हणून कायम राहणार असल्याची भूमिका भारताने मांडली आहे. कोळसा हा भारताच्या ऊर्जेचा मुख्य स्रोत असून भविष्यातही राहणार आहे. भारताने स्वत:ची नॉन-फॉसिल क्षमता 44 टक्क्यांपर्यंत वाढविली असली तरीही अद्याप सुमारे 73 टक्के वीजनिर्मिती कोळशाद्वारेच होते असे विदेश सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी म्हटले आहे. क्वात्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दुबई दौऱ्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत भारताची भूमिका मांडली आहे.
दरवर्षी जगभरातून 4 हजार कोटी टन कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन होते. यामुळे हवा प्रदूषण, जागतिक तापमानवाढ होत आहे. जीवाश्म इंधन यासाठी कारणीभूत ठरले आहे. जागतिक स्तरावर वीजनिर्मितीसाठी कोळसा, कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूचा सर्वाधिक वापर होतो. उत्सर्जन कमी करण्यासाठी कोळशावरील अवलंबित्व कमी करण्याचे आवाहन केले जात आहे.
वर्तमान पद्धतीद्वारे उत्सर्जन सुरूच राहिल्यास 2050 पर्यंत पृथ्वीवरील तापमान दोन अंश सेल्सिअसने वाढणार आहे. अशा स्थितीत काही ठिकाणी तीव्र दुष्काळ तर काही ठिकाणी विध्वंसक पूर संकट निर्माण होणार आहे. हिमखंड वितळल्याने समुद्राची पातळी वाढणार आहे. यामुळे समुद्रकिनारी वसलेली शहरे पाण्याखाली जातील आणि त्यांचे अस्तित्व संपुष्टात येणार आहे.
पंतप्रधान मोदी करणार संबोधित
पंतप्रधान मोदी हे 1 डिसेंबर रोजी सीओपी28 मधील वर्ल्ड क्लायमेट अॅक्शन समिटमध्ये सामील होणार आहे. तसेच या परिषदेला ते संबोधित करणार आहेत. याचबरोबर काही नेत्यांसोबत त्यांची द्विपक्षीय बैठक होणार आहे. ब्रिटनचे राजे चार्ल्स, पंतप्रधान ऋषी सुनक, अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्यासमवेत जगभरातील 167 नेते हवामान बदल आणि त्यावरील उपाययोजनांच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. काही वर्षांमध्ये हवामान बदल हे पूर्ण जगासाठी सर्वात मोठे आव्हान ठरले आहे.