दहशतवाद्यांकडून अल्पाइन क्वेस्ट अॅपचा वापर
सुरक्षादलांपासून वाचण्यासाठी नवा मार्ग
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीरमध्ये स्थिती बदलल्याने पाकिस्तानी दहशतवाद्यांचा आता स्थानिक दहशतवादी अणि त्यांच्या नेटवर्कवरील विश्वास डळमळीत झाला आहे. सुरक्षादलांच्या निरंतर देखरेखीपासून वाचण्यासाठी पाकिस्तानी दहशतवादी आता उपग्रहीय अन् रेडिओ फोनचा वापर टाळत आहेत. याचमुळे स्वत:च्या कारवायांसाठी स्थानिक नेटवर्कवर अवलंबून राहण्यासाठी ऑफलाइन लोकेशन अॅप ‘अल्पाइन क्वेस्ट’चा वापर दहशतवादी करत आहेत.
पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयने अॅपमध्ये काही दुरुस्ती करविल्या आहेत. या अॅपचा वापर सामान्यपणे ट्रेकर्स करतात. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे नेटवर्क जवळपास उद्ध्वस्त झाले आहे. पाकिस्तान आता दहशत फैलावण्यासाठी काश्मीरमध्ये विदेशी दहशतवाद्यांची घुसखोरी घडवून आणत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये सध्या सक्रीय दहशतवाद्यांची संख्या 125 हून अधिक असू शकते. यातील सुमारे 45 दहशतवादी हे जम्मू विभागाच्या राजौरी-पुंछ, कथुआ-उधमपूर-डोडा आणि किश्तवाडमध्ये सक्रीय आहेत.
लष्कर-ए-तोयबाची मुखवट संघटना द रेजिस्टेंस फ्रंट, जैश-ए-मोहम्मदची मुखवटा संघटना पीपल्स अँटी फासिस्ट फ्रंट, द काश्मीर स्ट्रायकर्स आणि तहरीक-ए-लबैक मुजाहिदीन-ए-इस्लामशी संबंधित दहशतवादी यात अधिक आहेत. लष्कर-ए-तोयबा आणि टीआरएफशी संबंधित विदेशी दहशतवाद्यांची संख्या 50 हून अधिक असण्याची शक्यता आहे.
अॅपचा होतोय वापर
सद्यकाळात सक्रीय विदेशी दहशतवादी स्थानिक ओव्हरग्राउंड वर्कर आणि गाइड्ससोबत कमी संपर्क ठेवत आहेत. ते स्वत:च्या गुप्त ठिकाणी अधिक लपून बसतात आणि सुरक्षा यंत्रणांपासून वाचण्यासाटी अल्पाइन क्वेस्ट अॅपच्या ऑफलाइन वर्जनचा वापर करत आहेत. दहशतवादी कमांडर्स आणि त्यांच्या हँडलर्सना स्थानिक ओव्हरग्राउंड वर्कर कधीही दहशतवाद्यांच्या ठिकाणाची माहिती सुरक्षा दलांना पुरवू शकातत अशी भीती सतावत आहे. अशास्थितीत विदेशी दहशतवादी स्थानिक हस्तकांवर विश्वास ठेवणे टाळत आहेत, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.
गूगल अर्थचे अॅडव्हान्स वर्जन
अल्पाइन क्वेस्ट अॅप गूगल अर्थचे अॅडव्हान्स वर्जन आहे. याचा वापर सर्वसाधारणपणे जंगल, नदी आणि पर्वतांमध्ये अॅडव्हेंचर टूर आणि ट्रेकिंगवर जाणारे लोक करतात. या अॅपमध्ये पूर्वीपासून निर्धारित कुठल्याही मार्गाला सेव्ह करण्याचाही पर्याय आहे. याच्या मदतीने कुणीही पर्वत, नदी किंवा जंगलातून मार्ग काढू शकतो. दहशतवादी कुठल्याही मार्गावरून जाताना त्याचा पूर्ण नकाशा संरक्षित करतात आणि नंतर त्याचा वापर इंटरनेटशिवाय केला जाऊ शकतो.
अनेक हल्ल्यांसाठी अॅपचा वापर
मागील दोन वर्षांमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये पकडण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या चौकशीत आणि मारले गेलेल्या दहशतवाद्यांकडून मिळालेल्या उपकरणांद्वारे ते इंटरनेटच्या विविध प्लॅटफॉर्मचा वापर करण्यास पारंगत होते असे दिसून आले आहे. राजौरी-पुंछ, कथुआसोबत डोडा आणि अनंतनागमध्ये दहशतवाद्यांनी याच अॅपचा वापर स्थळापर्यंत पोहोचणे आणि परतण्यासाठी केला होता.