फसवणूक टाळण्यासाठी मोबाईलचा वापर सतर्कतेने करा
सांगली :
डिजीटल युगात स्मार्ट फोनव्दारे ऑनलाईन व्यवहार करण्याचे प्रमाण वाढत आहे. सध्या जग कृत्रिम बुद्धिमत्ता युगात पाऊल ठेवत असून त्यासाठी फार काळजी घ्यावी लागणार आहे. फसवणुकीचे स्वरूप बदलले आहे. जागरूक असणे आवश्यक असून मोबाईल वापरताना सतर्क राहावे, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले.
श्रीमती पुतळाबेन शाह कॉलेज ऑफ एज्युकेशन सांगली येथे १५ मार्च जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. कार्यशाळेस जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलके, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी रूपाली सोळंके, प्राचार्य डॉ. बी. पी. मरजे, अॅङ धन्यकुमार धावते, डॉ. बिराज खोलकुंबे, डॉ. ज्ञानचंद्र पाटील यांच्यासह ग्राहक चळवळीचे कार्यकर्ते, विद्यार्थी, जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
ग्राहकांचे हक्क व कायद्यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी या हेतूने जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यात येत असल्याचे सांगून अप्पर जिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे म्हणाले, वस्तु खरेदी करताना त्या वस्तुची गरज किती आहे. ती किती टिकेल. पर्यावरणाच्या दृष्टीने ती पूरक आहे का याचा विचार करणेही गरजेचे आहे. यावर्षीचे ग्राहक दिनानिमित्ताचे शाश्वत जीवनशैलीकडे एक न्याय्य संक्रमण हे घोषवाक्य आहे. या अनुषंगाने डॉ. बिराज खोलकुंबे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. आपले उद्दिष्ट ठेवावे पण त्याच्या किती मागे लागावे याचा ज्याचा त्याने विचार करण्याची गरज आहे. स्वतः काय करायचे ते ठरवावे व स्वतःच्या मर्जीने जगावे. खाणे, कपडे, दैनंदिन उपक्रम व विचारावर आपली जीवनशैली दिसते.
धन्यकुमार धावते यांनी ग्राहक संरक्षण कायदा तुलनात्मक अभ्यास यावर मार्गदर्शन केले. फसवणूक झाल्यास ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार करू शकतो. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे ५० लाख रूपये पर्यंत, राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे ५० लाख ते २ कोटी पर्यंत व २ कोटीवर राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार करू शकतो. यासाठी ग्राहकांनी संबंधित बिल, वॉरंटी, गॅरंटी जपून ठेवावे असे सांगून कोणकोणत्या गोष्टीबाबत दाद मागता येते याची माहिती दिली. डॉ. ज्ञानचंद्र पाटील म्हणाले, ग्राहक चळवळ पुढे नेण्यासाठी सर्वांनी डोळस होवून लिहीते व्हावे, ग्राहकांना न्याय मिळेल.