कृषीतज्ञांच्या सल्ल्यानुसारच रासायनिक खतांचा वापर करा
पालकमंत्री सतीश जारकीहोळी : हस्तपत्रकांचे अनावरण
प्रतिनिधी/ बेळगाव
शेतीला अतिरिक्त रासायनिक खतांचा वापर झाल्यास जमिनीचा पोत बिघडतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषीतज्ञांच्या सल्ल्यानुसारच रासायनिक खतांचा वापर करावा, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले. युरिया खताच्या वापरामुळे शेतीवर होणारे दुष्परिणाम व शेततळ्याभोवती तारेचे कुंपण घालण्याबाबत जागृतीसाठी हस्तपत्रके तयार करण्यात आली आहेत. सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या गोकाक येथील निवासस्थानी हस्तपत्रके प्रकाशन समारंभ शनिवारी झाला. याप्रसंगी ते बोलत होते. त्यानंतर कृषी खात्याचे सहसंचालक एच. डी. कोळेकर यांनी युरिया खताचे दुष्परिणाम सांगून नॅनो युरिया वापराचे लाभ सांगितले. यावेळी गोकाकचे साहाय्यक कृषी संचालक एम. एम. नदाफ, विनायक तुराईदार, अधिकारी प्रकाश पाटील आदी उपस्थित होते.