महिला बास्केटबॉलमध्ये अमेरिकेला सलग आठवे सुवर्ण
वृत्तसंस्था/ पॅरिस
महिलांच्या बास्केटबॉल क्रीडा प्रकारात अमेरिकेने अतिशय चुरशीच्या लढतीत यजमान फ्रान्सचा 67-66 अशा निसटत्या फरकाने पराभव करून सुवर्णपदक पटकावले. अमेरिकन संघातील 42 वर्षीय डायना टॉरासीचे हे विक्रमी सहावे सुवर्णपदक पटकावताना तिने आपलीच माजी सहकारी स्यू बर्डचा सर्वाधिक ऑलिम्पिक सुवर्ण मिळविण्याचा विक्रम मागे टाकला. अमेरिकन महिलांनी मिळविलेले हे सलग आठवे ऑलिम्पिक सुवर्ण आहे.
डायना टॉरासीने याआधीच्या पाच ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला होता. पण यावेळी अंतिम लढतीत तिने भाग घेतला नव्हता. मात्र तिने कोर्टबाहेर राहून आपल्या सहकाऱ्यांना मार्गदर्शन केले. 1992 मधील बार्सिलोना ऑलिम्पिकपासून अमेरिकेने ऑलिम्पिकमध्ये सलग 61 सामने जिंकले आहेत. टॉरासीबद्दल बोलताना ब्रियाना स्टीवर्ट म्हणाली की, ‘अमेरिकन बास्केटबॉलसाठी ती सर्वस्व आहे. आम्ही नेहमी सोन्याच्या स्टँडर्डबद्दल बोलतो, पण टॉरासी आमच्यासाठी सोने आहे.’