अधिक तीव्रतेच्या चक्रीवादळाचा अमेरिकेला धोका
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
अमेरिकेत 10 दिवसांच्या कालावधीत दुसरे मोठे चक्रीवादळ धडकणार आहे. फ्लोरिडामध्ये मिल्टन चक्रीवादळावरुन इशारा जारी करण्यात आला आहे. नॅशनल हरिकेन सेंटरने याला सर्वाधिक विध्वंसक चक्रीवादळांची श्रेणी-5 मध्ये समाविष्ट केले आहे. या श्रेणीच्या चक्रीवादळामुळे मोठ्या जीवित तसेच आर्थिक हानीचा धोका असतो.
मिल्टन चक्रीवादळ बुधवारी फ्लोरिडाच्या अधिक लोकसंख्या असलेला भाग ‘टॅम्पा बे’ला धडकू शकते. सध्या हे चक्रीवादळ टॅम्पापासून 1 हजार किलोमीटर अंतरावर आहे. टॅम्पाची लोकसंख्या 30 लाखाहून अधिक आहे. चक्रीवादळ टॅम्पापर्यंत पोहोचण्यापूर्वीच ते कमजोर पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यानंतर हे चक्रीवादळ मध्य फ्लोरिडातून अटलांटिक महासागराच्या दिशेने सरकणार आहे.
मिल्टन चक्रीवादळ सध्या मेक्सिकोच्या उपसागरातून वाटचाल करत आहे. सोमवारी रात्री या चक्रीवादळाचा वेग सुमारे 285 किलोमीटर प्रतितास होता. हे चक्रीवादळ फ्लोरिडा प्रांताच्या दिशेने सरकत आहे. चक्रीवादळामुळे फ्लोरिडाच्या 67 पैकी 51 काउंटींमध्ये इमर्जन्सी अलर्ट जारी करण्यात आला आहे.
फ्लोरिडात किनारी भागांना रिकामी करविण्यात येत आहे. आतापर्यंत 5 लाख लोकांना सुरक्षितस्थळी पोहोचविण्यात आले आहे. अमेरिकेत यापूर्वी हॅलेन चक्रीवादळ आले होते, यामुळे 225 जणांना जीव गमवावा लागला होता. फ्लोरिडाचे गव्हर्नर डी सेंटिस यांनी लोकांना चक्रीवादळासाठी तयार राहण्याचे आवाहन पेले आहे. तसेच लोकांना लवकरात लवकर सुरक्षित स्थळी जाण्याची सूचना त्यांनी केली आहे.